वाळवा / शरद माने :
अतिवृष्टी व कृष्णानदीला आलेल्या महापुरामुळे वाळवा परिसरातील शेतात पाणी सान्नून सोयाबीन व भूईमूग पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. वाळवा तालुक्यातील नदीकाठच्या काही गावांमध्ये शासनाने पंचनामे केले. परंतू या भागातील पंचनामा करण्यात उशिर का केला जात आहे, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.
कोयना धरातून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णेचे नदी पाणी पातळीत वाढ होवून नदीकाठच्या शेतात साचले. सुदैवाने महापुराचा धोका टळला. परंतु नदीला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांच्या पात्रात नदीचे पाणी घुसल्यामुळे ओढा पात्रा लगतच्या नागरीवस्ती व शेत जमिनींना महापुराचा फटका बसला. भूईमूग, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
खरीप हंगाम अडचणीत आला आहे. साधारणपणे मे महिन्यात शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीसाठी पेरणी पूर्व मशागतीची कामे करत असतो. यावर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच वळीवाच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे अति पावसामुळे शेतकऱ्यांना करता आली नाहीत. पाऊस जून महिन्यापर्यंत पडतच राहिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. गडबड करून पावसापूर्वी ज्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली, त्यांना खरीपाची सोयाबीन, भुईमूग आदी पिके पेरण्या करण्यात यश मिळाले.
पावसामुळे अनेक उस उत्पादक शेतकऱ्यांना आडसाली ऊस पिकाच्या बांधणीची कामे करता आली नाहीत. पावसामुळे भरणी व बांधणी न झालेली ऊस पिके पडून भुईसपाट झाल्याचे चित्र आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसाने धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणातून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु झाल्याने पूरस्थिती निर्माण होऊन नदीकाठ भयभीत झाला होता. महापुराचा धोका टळला असला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून शासनाने पिकांचे पंचनामे करून प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.








