बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्यासाठी वडगाव, शहापूर शिवारात मातीचा भराव टाकला असल्याने शिवारातील पाणी वाहून न जाता तुंबून रहात आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेल्याने कुजण्याची भीती शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे बायपास रस्त्यातून जेसीबीच्या साहाय्याने पाणी जाण्यासाठी मार्ग करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे. वडगाव, जुनेबेळगाव, शहापूर, अनगोळ, माधवपूर-वडगाव व परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान दरवर्षी बळ्ळारी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे होत आहे. त्यामुळे बळ्ळारी नाल्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. मात्र, केवळ आश्वासन देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे. मध्यंतरी बळ्ळारी नाल्यातील जलपर्णी काढून काँक्रिटचे बांधकाम करण्याचे सांगितले होते.
मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली नाही. त्यामुळे यंदाही बळ्ळारी नाल्याच्या समस्येला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. मुसळधार पाऊस झाल्यास नाल्याला पूर येऊन पाणी शेतात शिरते. त्यामुळे भात व इतर पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर दुबार किंवा तिबार पेरणी करण्याचे संकट ओढवत आहे. त्यातच आता हलगा-मच्छे बायपास रस्त्यामुळे शेतकऱ्यांना दुसऱ्या एका संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. येथील शिवारातील पावसाचे पाणी वाहून जाऊन बळ्ळारी नाल्याला मिळत होते. मात्र, हलगा-मच्छे बायपास रस्ता केला जात असल्याने शिवारातील पाणी वाहून न जाता तेथेच तुंबून रहात आहे. परिणामी धूळवाफ पेरणी केलेले भातपीक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले असून प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालून शिवारातील पाणी बळ्ळारी नाल्याकडे जाण्यासाठी बायपासच्या रस्त्यावरून ठिकठिकाणी चरी खोदण्यात याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे.









