कवळे जि.पं. सदस्य गणपत नाईक यांचे उद्गार : भूमिगत वीज वाहिन्या योजनेचा बांदोड्यात शुभारंभ
वार्ताहर / मडकई
&प्रशासनाची योग्य जाण असल्यामुळे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या वाट्याला आलेल्या आजपर्यंतच्या प्रत्येक खात्याला त्यांनी योग्य न्याय दिला आहे. वीज खात्याचा ताबा घेऊन केवळ आठ महिन्यात वीज पुरवठ्यात आमुलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी आश्वासक पाऊल टाकले आहे. कामाचे नियोजन व दर्जा सांभाळतानच ऊ. 50 कोटी खर्चून भूमीगत वाहिन्या हा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतल्याबद्दल त्यांच्या कार्यक्षमतेला दाद द्यावी लागेल, असे उद्गार कवळे जिल्हा पंचायत सदस्य पंचायत सदस्य गणपत नाईक यांनी काढले.
बांदोडा पंचायत क्षेत्रात वीज खात्यातर्फे आयोजित केलेल्या भूमीगत वाहिन्या योजनेच्या पायाभरणी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सरपंच सुखानंद कुर्पासकर, उपसरपंच चित्रा फडते, वीज खात्याचे मुख्य अभियंते स्टिफन फर्नांडिस, कार्यकारी अभियंते पी. पी. भरथन, साहाय्यक अभियंते केशव गावडे, कनिष्ठ अभियंते अजय परांजपे, पंचसदस्य वामन नाईक, मुक्ता नाईक, राजू बांदोडकर, मनीषा कुर्पासकर, व्यंकटेश गावडे, सोनीया नाईक, रामचंद्र नाईक, रेश्मा मुल्ला आदी व्यासपिठावर उपस्थीत होते. पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या खंडित वीज प्रवाहामुळे नागरिकांच्या तक्रारीत वाढ होत होती. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांना संतप्त नागरिकांना तोंड द्यावे लागत होते. या योजनेमुळे प्रवाहात सुधारणा होऊन वीज कर्मचारी व जनतेलाही दिलासा मिळेल, असे श्री. नाईक पुढे म्हणाले.
सुखानंद कुर्पासकर म्हणाले, भूमीगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी बांदोडा पंचायत क्षेत्रात चर खोदण्याचे काम सुऊ झाले आहे. त्यामुळे वाहतूक व धुळ प्रदूषणाचा थोडा त्रास होईल. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
स्टिफन फर्नांडिस यांनी आपल्या भाषणात सांगितले, पावसाळ्यात वादळ वाऱ्यामुळे वीज वाहिन्यांवर झाडे कोसळतात. त्यामुळे प्रवाह खंडित तर होतोच शिवाय जिवंत तारांच्या संपर्कात आल्यास जीवितहानी होण्याचा धोकाही असतो. भूमिगत वीज वाहिन्यांमुळे या समस्येला कायमचा विराम मिळणार आहे. पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्याची काटछाट करावी लागत होती. त्यातून निसर्गाची होणारी हानीही थांबणार आहे. वीज खात्यातर्फे ग्राहकांना उत्कृष्ठ सेवा व अखंडित पुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
केशव गावडे म्हणाले, या प्रकल्पामुळे मतदार संघातील वीज पुरवठ्यात महत्त्वपूर्ण सुधारणा होतील. मत्री ढवळीकरांनी वीज खात्याचा ताबा घेताच मुख्य अभियंता ते लाईनमन पर्यंत सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.
मंत्री सुदिन ढवळीकरांच्या ध्यास व श्वासाच्या या ज्योती…!
वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या श्वास व ध्यासातून या समईतील ज्योती प्रज्वलीत झालेल्या आहेत. मतदार संघावर मनस्वी प्रेम करणाऱ्या मंत्री सुदिन ढवळीकरांनी ग्रामीण भागात भूमिगत वीज वाहिन्या टाकून 24 तास व अखंडीत वीज पुरवठा करण्याचा विडा आहे. अशा शब्दात प्रेक्षागृहातील मान्यवर व व्यासपिठावरील मान्यवरांनी मंत्री ढवळीकरांचे कौतूक केले. काही अपरिहार्य कारणास्तव ते या कामाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी कार्यक्रम रद्द केला नाही. कुठल्याही परिस्थीतीत कार्यक्रम व्हावा, जनतेला सुखसोई वेळेत मिळाव्यात हा निर्णय स्वागताहर्य असल्याच्या प्रतिक्रिया या कार्यक्रामात काही ज्येष्ठ कार्यकर्ते व मान्यवरांनी व्यक्त केल्या. जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंचसदस्य व त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांवर त्यांचा पूर्ण विश्वास असल्याचे या निर्णयातून दिसून येते. देशतला ग्रामीण भागात राबविण्यात आलेला पहिला मलनिस्सारण प्रकल्प त्यांनी दुर्भाट सारख्या अत्यंत ग्रामीण भागात राबविला. मतदार संघाचा मान वाढविला. तसाच गोव्याचा ग्रामीण भागात मतदार संघात 11 केव्ही व 33 केव्ही भूमीगत वाहिन्या हा पहिलाच प्रकल्प असल्याने त्यांच्या कामाला सलाम…! अशा शब्दात मंत्री सुदिन ढवळीकर यांचे त्यांच्या अनुपस्थीतीत अभिनंदन झाले.
स्वागत चित्रा फडते यानी केले. गणपत नाईक व अन्य मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलीत व फलकाचे अनावरण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन दीपा मिरींगकर यांनी तर सोनीया नाईक यांनी आभार मानले.









