खानापूर तालुक्यातील चित्र
खानापूर : हार्वेस्टरने तोडणी केलेल्या उसातून प्रतिटन 4.5 टक्के पाचटाची वजावट करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. यानुसार एक टन उसाचे (1000 किलो) 4.5 टक्के म्हणजे 45 किलो होतात. वीस ते 22 टनाच्या एका खेपेतून (20 गुणिले 45) सरासरी 900 ते एक हजार किलो वजन कमी होणार आहे. यामुळे एका खेपेमागे पाऊण ते एक टन म्हणजे शेतकर्यांना एफआरपीनुसार 2500 ते 3000 रुपयांचा फटका बसणार आहे. तोडणी अन् वाहतूक करणार्यांचेही खानापूर तालुक्यात नुकसान होणार आहे.
दिवसेंदिवस मजुरांकडून ऊस तोडणी करणे मुश्कील बनत चालले आहे. कारखानदार व वाहन चालकांची मुकादमाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. तसेच मजूर तोडीसाठी शेतकर्यांकडून अव्वाच्यासव्वा रक्कम घेत आहेत.
यामुळे मागील चार-पाच वर्षांपासून हार्वेस्टरने ऊस तोडणी करण्याचा पर्याय पुढे आला आहे. यात तोडणी एका दिवसात संपते; पण हार्वेस्टरचे वजन मोठे असल्याने शेताचे प्रचंड नुकसान होत आहे. सरी साडेचार ते पाच फूट असेल तर हार्वेस्टरने तोडणी चांगली होते, अन्यथा साडेतीन ते चार फुटी सरीतील ऊस हार्वेस्टरच्या चाकाखाली सापडून मोठे नुकसान होते. तसेच सध्या हार्वेस्टरने तोडणी करताना प्रतिटन एक टक्के पालापाचोळ्याची वजावट केली जात आहे. मजुरांकडून तोडणी करताना 1.5 टक्के वजावट होते.
मात्र भविष्यातील मजूर टंचाई व पावसाचे प्रमाण पाहता हार्वेस्टरशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येते. त्यासाठी साखर आयुक्तालयाने हार्वेस्टरने तोडणी करताना उसात येणार्या पाचटाचे वजन निश्चित करण्यासाठी अभ्यास गट नेमला होता. या गटाने शासनास एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात प्रतिटन 4.5 टक्के पाचटाची वजावट करण्याची शिफारस केली आहे. राज्य शासनाने यास नुकतीच मंजुरी दिली आहे.