वैभववाडी/प्रतिनिधी-
करूळ घाटातील पायरी घाट येथे संरक्षक भिंत कोसळल्याने करूळ घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. घाटमार्ग ठप्प झाल्याने तरळे – कोल्हापूर राष्ट्रीय मार्गावरील अवजड वाहतूक फोंडाघाट व आंबोली घाट मार्गे तर लहान वाहने भुईबावडा मार्गे वळविण्यात आली आहे. कोसळलेल्या संरक्षक कठड्याच्या ठिकाणी पत्र्याचे बॅरल लावण्यात आले आहेत.
गेले तीन दिवस वैभववाडी तालुक्यात धुवाधार पाऊस कोसळत आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या या पावसाचा त्याचा सर्वात जास्त फटका करूळ घाट मार्गाला बसला आहे. करूळ घाटातील पायरी घाट नजीक दरीकडील बाजूची संरक्षक भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने साईड पट्टीचा भागही दरीत कोसळला आहे.
घाटातील संरक्षक कठडा कोसळल्याची माहिती करूळ चेक नाक्यावर देण्यात आली. त्यानंतर असलेल्या पोलीस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रात्री घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेल्या संरक्षक कठड्याच्या ठिकाणी तात्पुरती व्यवस्था म्हणून पत्र्याचे बॅरल व फलक लावण्यात आले आहेत. पोलिसांनी या घाटमार्गातील वाहतूक पूर्णतः बंद केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी येऊन या कोसळलेल्या संरक्षक कठड्याची पाहणी करून या घाटातून एकेरी वाहतूक सुरू करता येईल का याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली. त्यामुळे हा घाटमार्ग अनिश्चित कालावधीसाठी बंद राहणार आहे.









