चिपळूण :
गेल्या अनेक वर्षापासून पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत असलेला आणि वारंवार मागणी करूनही दुर्लक्षित राहिलेला पिंपळी नदीवरील 81 मीटर लांबीचा दगडी पूल शनिवारी रात्री खचल्याने दसपटीसह गाणे-खडपोली औद्योगिक क्षेत्राचा संपर्क तुटला आहे.
या भागातील संपर्कासाठी साडेतीन कि.मी.चा अधिकचा वळसा मारून दोन पर्यायी मार्ग असले तरी औद्योगिक क्षेत्राची अवजड वाहतूक थांबली असून उद्योजकांसमोर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सायंकाळी उशिरापर्यत सुरू असला तरी पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर ग्रामस्थ संतापले आहेत.
या भागातील जनतेसाठी 1968 मध्ये पिंपळी येथील नदीवर हा दगडी पूल बांधण्यात आला. 81 मीटर लांबी आणि साधारणपणे साडेचार मीटर रुंदीच्या असलेल्या या पुलाला तब्बल 67 वर्षे झाल्याने गेल्या काही वर्षापासून तो कमकुवत झाला होता. स्थानिक पातळीवर या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी मागणी सातत्याने होत होती. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारित असलेल्या या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी आमदार शेखर निकम यांनीही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. अशातच 5 जुलै रोजी चिपळूण दौऱ्यात पालकमंत्री उदय सामंत यांनी या पुलासह कॅनॉलवरील दुसऱ्या पुलासाठी एकूण 27 कोटी रुपये मंजुरीची घोषणा केली होती. त्यावर पुढील कार्यवाही सुरू असतानाच शनिवारी रात्री हा पूल खचला.

- तरुणाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
गेल्या आठवड्यात सोमवारपासून दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीत खचलेल्या या पुलाला चाटून पाणी जात होते. पाण्याला गतीही अधिक होती. पूल अगोदरच कमकुवत असल्याने हा पूल कधीही धोका देईल, हे ओळखून काही जण दररोज या पुलाचे निरीक्षण करत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देत असत. शनिवारी रात्री पिंपळी येथील तरुण आणि राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष राजू सुतार रात्री 9 वाजता या पुलावरून जात असतानाच त्यांना पुलाला भेग दिसून आली. गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ या पुलावरून जाणारी वाहतूक तेथेच थांबवून बांधकाम विभागाला कळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
- अधिकारी, ग्रामस्थ चर्चा करत असतानाच पूल खचला
पुलाला भेग गेल्याचे कळताच बांधकाम विभागाचे उपअभियंता अरुण मुळजकर, शाखा अभियंता महेश वाजे घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यानंतर राजू सुतार, मुराद अडरेकरसह स्थानिक नागरिकही जमा होऊन तेथे चर्चा करत होते. अशावेळी अचानकपणे आवाज करत पुलाचा क्रमांक दोनचा पिलर खचला. त्यामुळे मधोमध हा पूल खचला. यावेळी तेथे उपस्थित असलेले काही जण दैव बलवत्तर म्हणून वाचले.
- मोठा अनर्थ टळला
तसे पाहिले तर हा पूल कमकुवत झाला होता. तो कधीही कोसळू शकतो, अशी शक्यता स्थानिक वेळोवेळी व्यक्त करत होते. बांधकाम विभागाशी कायम संपर्कात होते. मात्र पूल खचून वाहतूक बंद झाल्यानंतर संतप्त झालेल्या स्थानिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सुदैवाने पाऊस नसताना व भेग गेल्यानंतर वाहतूकही वेळीच थांबवल्याने सावित्री नदी पुलासारखी मोठी घटना टळल्याचे सांगत स्थानिकांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
- वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
पूल खचल्यानंतर पोलीस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली. तत्काळ वाहतूक बंद करत ती पेढांबे-खडपोलीमार्गे वळवण्यात आली. मात्र हा मार्गही तसा एकेरी आहे. त्यामुळे सर्वच अडचणी निर्माण झाल्या आहेत.
- दसपटकरांना साडेतीन कि.मी.चा अधिकचा वळसा
पिंपळी पूल खचल्याने दसपटीतील नांदीवसे, तिवरे, तिवडी, रिक्टोली, कादवड, आकले, इंदापर, स्वयंदेव, ओवळी, कळकवणे, वालोटी, गाणे, दादर आदी गावांतील ग्रामस्थांना आता पेढांबे व वालोटी या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. मात्र तसे केल्यास त्यांना साडेतीन कि.मी.चा अधिकचा वळसा बसणार आहे. या गावांतून सती-चिंचघरी येथे हायस्कूल, कॉलेजमध्ये असंख्य विद्यार्थी येतात, त्यांचेही हाल होणार आहेत. हे पर्यायी मार्ग एकेरी असल्याने विशेषत: गणेशोत्सवात येणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना वाहतूककोंडीलाही सामोरे जावे लागणार आहे.
- औद्योगिकसाठी वालोटीमार्गे पर्याय
पूल खचल्याने सर्वात मोठी अडचण औद्योगिक क्षेत्राची झाली आहे. या भागात साफयिस्ट, जे. के. फाईल्स, कृष्णा अॅन्टीऑक्सीडंटस् यासारखे मोठे उद्योग आहेत. त्यांच्याकडे येणारे कंटेनर, टँकर यासारख्या अवजड वाहतुकीचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शनिवारी रात्रीपासून अवजड वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. लहान वाहनांसाठी पेढांबे, वालोटी मार्गाचा पर्याय आहे. मात्र अवजड वाहनांसाठी नाही. त्यामुळे आता अवजड वाहतुकीसाठी कळंबस्ते, मोरवणे, दळवटणे वालोटी मार्गाचा पर्याय पुढे आला. सद्यस्थितीत हा मार्गही अवजड वाहतुकीसाठी पुरेसा नसला तरी त्याची वळणे, विजेचे खांब हटवून काही उपाययोजना केल्या तर या मार्गावरून अवजड वाहतुकीचा प्रश्न मिटणारा आहे. त्यादृष्टीने रविवारी येथे दाखल झालेले एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी पर्यायाचा विचार करत होते.
- आमदार शेखर निकमांचा अजित पवारांशी संपर्क
पूल खचल्यानंतर आमदार शेखर निकम यांनी शनिवारी रात्रीच उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधला. उपमुख्यमंत्री पवार यांनी निधी उपलब्ध करून देतो, तत्काळ अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.








