गगनबावडा प्रतिनिधी
बावेली-गारीवडे ता.गगनबावडा या दोन गावांदरम्यान धामणी नदीवर पाणी अडविण्यासाठी बांधलेला मातीचा बंधारा अचानक फुटल्याने येथील शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा व कष्ट वाया घालविण्याच्या या द्रुष्टचक्रातून येथील जनतेची केव्हा सुटका होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
डिसेंबर महिना सुरु झाला की गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे व धामणी खोरीतील जनतेला पाण्याचे वेड लागते.पिके जगविण्यासाठी पाण्याचा साठा कसा होईल याचा विचार सुरू होतो.यातूनच मातीच्या बंधाऱ्यांची लगबग सुरू होते.धामणी नदीतीरावरील अगदी सुळेपासून राई पर्यंत पिकांसाठी पाणी अडविण्यासाठी भागीदारीतून मातीचे बंधारे घातले जातात.पूर्वेकडील गावे तर नोव्हेंबरमध्येच घालतात.काही पूर्ण झाले तर काही ठिकाणी अंतिम टप्प्यात आले आहेत.बावेली-गारीवडे दरम्यान नदीवरील बंधारा नुकताच पूर्ण केला होता.सोमवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास हा मातीचा बंधारा फुटला अन काही काळ येथील शेतकऱ्यांचा ठोका चुकला.जे.सी.बी.मशीन,ट्रॅक्टर,शेतकरी यांनी आठवडाभर रात्रंदिवस राबून पाणी अडविलेला बंधारा फुटल्याने सगळे कष्ट वाया गेले होते.सुमारे ७०० मिटर अंतरावर पाण्याने तुडुंब साठलेले नदीपात्र क्षणार्धात रिकामे झाले.होत्याचे नव्हते झाले.आशेची निराशा झाली.चार गावांतील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.पून्हा नव्याने तेवढाच खर्च करावा लागणार आहे.