प्रा. अक्षय यादव यांच्याकडून वकिलांना मार्गदर्शन
बेळगाव : कोरोनामुळे विविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्येही मोठा बदल झाला असून कोरोनामुळे ई-फायलिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारखे संगणकीय तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. यामुळे वकिलांना आणि न्यायाधीशांनाही त्याचा फायदा झाला आहे. आता अधिकाधिक संगणकीय ज्ञानाकडे वळणे महत्त्वाचे असल्याचे मत प्रा. अक्षय यादव यांनी व्यक्त केले. वकिलांना मार्गदर्शन करण्यासाठी बार असोसिएशन व भारतपर्व फाऊंडेशनच्यावतीने ‘तंत्रज्ञान आणि कायदा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यामध्ये त्यांनी हे मत व्यक्त केले. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दिवसेंदिवस बदल होत चालला आहे. कोरोनाच्या तीन लाटांमध्ये तंत्रज्ञानामध्ये मोठा बदल झाला. याचबरोबर तशा कायद्याचीही तरतूद करण्यात आली. पूर्वी संबंधित न्यायालयामध्ये जाऊन खटला दाखल करावा लागत होता. मात्र, आता ऑनलाईनच्या माध्यमातून ई-फायलिंग करून खटला चालविता येतो. वकिलांना त्या खटल्याची तारीख आणि वेळ दिला जात होता. त्याचबरोबर पक्षकार, न्यायाधीश आणि वकील यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सही होत होती. त्यामध्ये साक्षी नोंदविणे, युक्तिवाद करणे हे सर्व सुरळीतपणे पार पडले. भविष्यात अशाच प्रकारे आता न्यायालयीन कामकाज चालणार आहे. त्यामुळे अधिकाधिक ज्ञान घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. वकील समुदाय भवन येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये वकिलांनी आपला सहभाग दर्शविला. जनरल सेक्रेटरी गिरीराज पाटील यांनी प्रा. अक्षय यादव यांचे स्वागत केले. तब्बल एक तास त्यांनी वकिलांना मार्गदर्शन केले. याचबरोबर आणखी काही व्याख्याने आयोजित करून त्यामधून नवीन तंत्रज्ञानाची माहिती दिली जाईल, असे सांगितले.









