रविवार, 15 ऑगस्ट, पारसी नववर्षारंभ असल्याने पर्यटकांची होणार गर्दी
► प्रतिनिधी/ बेळगाव
जुलैच्या शेवटच्या पंधरवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाले आणि जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहीत झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. विशेषत: शनिवार, रविवारी पर्यटनस्थळी गर्दी होऊ लागली आहे. त्याचबरोबर येत्या मंगळवारी 15 ऑगस्ट तर बुधवारी पारसी नववर्षारंभामुळे सलग सुट्या आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांना बहर येणार आहे.
यंदा पावसाला उशिराने प्रारंभ झाला. त्यामुळे जुलै अखेरपासून धबधबे प्रवाहीत झाले आहेत. सध्या अधूनमधून पाऊस होत असला तरी धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहीत झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओघ सुरू आहे. विशेषत: 15 व 16 ऑगस्ट दिवशी शासकीय सुटी असल्याने धबधब्यांवर गर्दी वाढणार आहे. कुटुंबांसह तरुण-तरुणी पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी प्राधान्य देणार आहेत.
शहरापासून जवळ असणाऱ्या गोकाक, गोडचिनमलकी, हिडकल, आंबोली, नविलतीर्थ, बाबा फॉल्स, तिलारी, स्वप्नवेल, सुंडी, पारगड, किटवाड आदी धबधब्यांवर गर्दी होऊ लागली आहे. कर्नाटकात धबधब्यांवर बंदी असल्यामुळे पर्यटक महाराष्ट्रातील धबधब्यांकडे वळू लागले आहेत. त्यामुळे अलीकडे नावारुपाला आलेल्या सुंडी आणि किटवाडच्या धबधब्यांवर गर्दी होत आहे.
धबधबास्थळी जाताना हिरवीगार झाडे आणि शेती पर्यटकांना आकर्षित करीत आहे. त्यामुळे निसर्गाबरोबर सेल्फी घेताना पर्यटक दंग होऊ लागले आहेत. विशेषत: उंचावरून फेसाळणारे धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत.
धबधब्यांवर हुल्लडबाजीचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे दुर्घटना घडत आहेत. काठावर जाऊन फोटो काढणे, सेल्फी घेणे, स्टंटबाजी करणे, खोल दरीत उतरणे आदी प्रकार वाढले आहेत. विशेषत: तरुणाईकडून मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालण्याचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे प्रशासन याकडे लक्ष देणार का? हेही पहावे लागणार आहे.
वर्षापर्यटनासाठी विशेष बससेवा
वर्षापर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी परिवहनने विशेष बससेवेची सोय केली आहे. आंबोली, गोकाक, गोडचिनमलकी, हिडकल आदी ठिकाणी बसेस सोडण्यात येत आहेत. दुसरा-चौथा शनिवार, दर रविवार आणि शासकीय सुटीदिवशीही विशेष बसेस धावत आहेत. त्यामुळे कुटुंबांसह वर्षापर्यटनाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांची सोय झाली आहे.









