मडगाव : वादळी वारे व पावसामुळे सासष्टीत सलग गेल्या आठ दिवसांपासून पडझड होत असून अग्नीशामक दलाच्या जवानांना सातत्याने धावपळ करावी लागत आहे. दिवस-रात्र अग्नीशामक दलाचे जवान घरांवर तसेच रस्त्यावर आणि वीज वाहिन्यावर पडलेली झाडे हटविण्यासाठी राबत आहे. काल मंगळवारी घोंटेनाईक वाडो-ओर्ली येथे मारूती ओमनी आणि मारूती वॅगन आर या दोन वाहनांवर झाड पडून सुमारे 45 हजार रूपयांची हानी झाली. अग्नीशामक दलाने दोन लाख रूपयांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले. केसरव्हाळ-वेर्णा येथील राज एन्क्लेव्ह बिल्डिंगच्या मीटर बॉक्सला आज सकाळी आग लागून सुमारे दहा हजार रूपयांची हानी झाली. वेर्णा अग्नीशामक दलाने घटनास्थळी भेट दिली. परंतु, त्यापूर्वीच मीटर बॉक्स जळून खाक झाले होते. वेर्णा औद्योगिक वसाहतीतील डी-लिंक फॅक्टरीजवळ झाड कोसळले. हे झाड वेर्णा अग्नीशामक दलाने हटविले.
कासावली येथे चर्चजवळ नारळाचे झाड रस्त्यावर पडल्याने काही वेळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. नारळाचे हे झाड अग्नीशामक दलाने हटविले व रस्त्या वाहतुकीस मोकळा करून दिला. मुरीडा-फातोर्डा येथे झाड गॅरेजवर कोसळल्याने सुमारे 40 हजारांची हानी झाली. मडगाव अग्नीशामक दलाने घटनास्थळी भेट देत हे झाड हटविले व 50 हजारांची मालमत्ता वाचविली. ही घटना काल सकाळी 8.30च्या दरम्यान घडली. धर्मापूर येथे आंब्याचे झाड रस्त्यावर व संरक्षक भींतीवर पडले. त्यात संरक्षक भींतीची हानी झाली. हे झाड मडगाव अग्नीशामक दलाने हटविले. वेळसांव येथील दामोदर हॉटेलजवळील एका शेडवर नारळाचे झाड पडले. त्यात शेडची सुमारे पाच हजार रूपयांची हानी झाली. हा नारळाचे झाड वेर्णा अग्नीशामक दलाने हटविले व 50 हजार रूपयांची मालमत्ता वाचविली. कोलवा पोलीस स्थानकाजवळी अंतर्गत रस्त्यावर काल संध्याकाळी आंब्याड्याचे मोठे झाड रस्त्यावर पडल्याने संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. मडगाव अग्नीशामक दलाने हे झाड हटविले व रस्ता वाहतुकीस खुला केला.









