म्हसवड :
शाळांचे चालू शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शाळा विद्यालयामध्ये लवकरच परीक्षांचा हंगाम सुरू होणार आहे. यावर्षी महाराष्ट्रात उन्हाळ्याची दाहकता जास्त असल्याने महाराष्ट्र शासनाने १५ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगला निर्णय असला तरी सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे वेळापत्रक जाहीर आहे, ते विद्यार्थ्यांना तापदायक होणारे आहे. सातारा जिल्हा शिक्षण विभागाने सकाळी ७ ते १२.३० या वेळापत्रकामध्ये बदल करून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच शाळा भरवण्यात याव्या, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
- फेब्रुवारीमध्ये उन्हाचा चटका अन् घामाच्या धारा
एप्रिल, मेचा तडाखा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच जाणवू लागल्याने १० वाजताच लोकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. उन्हामुळे दुपारी रस्ते मोकळे दिसत असून वाहतूकही विरळ होत आहे. अशातच जिल्हा परिषद शाळेची लहान मुले शाळा सुटल्यानंतर भर उन्हात घरी जाताना दिसत अन्त. अनेक गरीब कुटुंबातील मुलांच्या पायात चप्पल सुद्धा नसते. त्यामुळे घरी चालत जाणाऱ्या अनवाणी असलेल्या मुलाच्या पायाला चटके बसत घर गाठावे लागतात. तसेच उन्हाच्या त्रासामुळे त्वचा व डोळे यांचेही विकार होण्याची शक्यता वाढल्याने सकाळी ७ ते १२.३० हे सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तयार केलेले वेळापत्रकात बदल करून शाळा सुटण्याची वेळ १२.३० ऐवजी ११ करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने काढावेत, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तसेच पालकांनी केली आहे.
- शेजारील जिल्ह्याप्रमाणे माणमध्येही साडेअकराला शाळा सोडाव्यात
प्राथमिक, माध्यमिक, बालवाडी, अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत असलेल्या बालकांना कडक उन्हाचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शिक्षण विभागाने सकाळी ७ ते १२.३० असे वेळापत्रक केले आहे. दुपारी १२.३० वाजता भर उन्हात शाळा सोडली जात आहे. विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होतो. उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य होत आहेत. शिक्षण विभागाने शेजारील जिल्ह्यात सकाळी ११.३० वाजेपर्यंत शाळा सोडल्या जातात. त्याप्रमाणे माण तालुक्यातही १२.३० ऐवजी ११.३० ला प्राथमिक, माध्यमिक, बालवाडी, अंगणवाडी शाळा सोडाव्या.
– प्रशांत माने, पालक, म्हसवड








