वृद्ध, महिला, रुग्णांचे हाल : पूर्वकल्पना न देताच मार्गात बदल
बेळगाव : राज्योत्सवाच्या नावावर कन्नड संघटनांनी शहरात अक्षरश: धिंगाणा घातला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. परिवहन मंडळाकडून वाहतूक व्यवस्था बंद ठेवल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. नागरिकांना बसअभावी शहराला येणे कठीण बनले. खासगी वाहनेही बंद असल्याने नागरिकांना पायपीट करावी लागली. शहरात प्रवेश करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या मार्गांवर बॅरिकेड्स घालून रस्ते बंद केले होते. अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था वळविल्याने नेमक्या कोणत्या मार्गाने जावे याचा चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विशेषकरून रुग्णालयांना येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसला. जिल्हा रुग्णालय परिसरातील वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागला. डीजेच्या कर्कश आवाजाने रुग्णांनाही त्रास झाला.
टिळकवाडी परिसरातून केएलईकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने व ठिकठिकाणी रस्ते बंद केल्याने मोठा गोंधळ उडाला होता. अनेकांना रेल्वे गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सदाशिवनगर येथून वाहतूक मार्गात बदल केल्यामुळे वाहनधारकांना गांधी चौक, कॅम्पमार्गे रेल्वेस्थानक गाठावे लागले. परिवहनची वाहतूक व्यवस्था उपलब्ध असल्याचे समजून खासगी वाहनाने शहरात आलेल्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. रिक्षाचालकांनी दुप्पट दर आकारल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला. एक कि.मी. अंतर गाठण्यासाठी पाच ते सहा कि.मी.चा प्रवास करावा लागला. उपनगरांतील नागरिकांनाही रिक्षा व बसअभावी पायपीट करावी लागली. पोलिसाकडून वाहतूक मार्गात बदल केल्याबाबत कोणतीच पूर्वसूचना दिली नसल्याने चालकांना प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका बसला. त्यामुळे प्रशासनाबद्दल वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. महिला, वृद्ध नागरिकांना पायपीट करत घर गाठावे लागले. तर काहींना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.









