कर्नाटकातील कंत्राटदारांवर प्राप्तीकरने छापे टाकले असून सापडलेली रक्कम राजकीय नेत्यांशी संबंधीत आहे. यावरुन काँग्रेस, भाजपात संघर्ष पेटला आहे. दुसरीकडे सतीश जारकीहोळी व डी के यांच्यात बिनसल्याचे समजते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे. निजदचे सी. एम. इब्राहिम यांनी भाजपसोबत जाण्यास विरोध दर्शवल्याने हा तिढा निजदला कसा सोडवायचा हा प्रश्न पडला आहे. लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी राज्यात राजकीय अस्थिरतेचा गरबा पाहायला मिळतो आहे.
ऐतिहासिक म्हैसूर दसरोत्सवाला सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक हंसलेखा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत चामुंडेश्वरी देवीच्या पूजनाने दसरोत्सवाला चालना देण्यात आली आहे. संपूर्ण राज्य दसऱ्याच्या मूडमध्ये असतानाच कर्नाटकातील काही प्रमुख कंत्राटदारांवर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले आहेत. या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. कंत्राटदारांच्या घरात सापडलेली रक्कम राजकीय नेत्यांशी संबंधित आहे. त्यावरून काँग्रेस व भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तर काँग्रेस सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीविरुद्ध भाजपने आंदोलनही सुरू केले आहे. भाजप सत्तेवर होता त्यावेळी हे काम काँग्रेस नेते करीत होते. भाजपवरही 40 टक्के कमिशनसह अनेक गंभीर आरोप झाले होते. आता आरोप करणाऱ्यांच्या जागेवर भाजप नेते आहेत. प्राप्तीकरच्या छाप्यात सापडलेली रक्कम पार्टी फंडसाठी जमवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या कारवाईआड मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे चिरंजीव यतिंद्र यांना लक्ष्य बनविण्यात आले आहे.
गेल्या निवडणुकीत 135 जागा मिळवून सत्तेवर आलेल्या काँग्रेसमधील लाथाळ्या पुन्हा चव्हाट्यावर आल्या आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या समर्थकांतील संघर्ष तीव्र झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे समर्थक सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी व डी. के. शिवकुमार यांच्यातील रुसवेफुगवेही उफाळून आले आहेत. सतीश जारकीहोळी, रामलिंगा रे•ाr, ईश्वर खंड्रे, एन. चंद्राप्पा, सलीम अहमद या नेत्यांना कार्याध्यक्षपदावरून मुक्त करून नव्या कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेतूनच नाराजी ओढवल्याने सतीश जारकीहोळी आपल्या 20 ते 25 समर्थक आमदारांना घेऊन म्हैसूरला निघाले होते. प्रवासाची तयारीही करण्यात आली होती. हायकमांडच्या सूचनेवरून त्यांना हा प्रवास रद्द करावा लागला आहे. याचे परिणाम बुधवारी बेळगावातही दिसून आले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे हुक्केरी हिरेमठाच्या दसरोत्सव कार्यक्रमात भाग घेण्यासाठी बेळगावला आले होते. त्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील कोणीच काँग्रेसचे नेते विमानतळावर पोहोचले नाहीत.
कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-निजद युतीच्या पतनाची तयारी बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणातूनच सुरू झाली होती. रमेश जारकीहोळी यांच्यासह काँग्रेस व निजदमधील 17 आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन युती सरकार पाडले. आता सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारकडे 135 आमदारांचे संख्याबळ आहे. तरीही सरकार डळमळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेता विरोधकांपेक्षा काँग्रेसमधील स्वकीयच आघाडीवर आहेत, हे लक्षात येते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समर्थकांतील संघर्ष वाढतो आहे. या संघर्षातूनच काँग्रेसमधील गटबाजीत भर पडत आहे. आता सतीश जारकीहोळी संतप्त झाले आहेत. डी. के. शिवकुमार आणि रमेश जारकीहोळी यांच्यातील संघर्षामुळेच युती सरकारचे पतन झाले. आता सतीश जारकीहोळी विरुद्ध डी. के. शिवकुमार यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. शिवकुमार यांनी बेळगाव जिल्ह्यातील राजकारणात हस्तक्षेप करू नये ही जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांची जुनीच मागणी आहे. आता या संघर्षाचे परिणाम काय होणार? याची साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे.
निजदमधील परिस्थितीही ठीक नाही. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी व त्यांचे चिरंजीव निखिल कुमारस्वामी यांनी नवी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची भेट घेऊन भाजप आणि निजद युतीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाला निजदचे प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी उघडपणे विरोध केला आहे. कुमारस्वामी यांनी कोणालाही विश्वासात न घेता युतीचा निर्णय घेतला आहे. त्यांना भाजपबरोबर युती करू द्या, आमचा पाठिंबा काँग्रेसलाच राहणार, अशी भूमिका इब्राहिम यांनी जाहीर केली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही युती आपल्याला मान्य नाही, असे सांगत त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठकही घेतली. आपण आहे तोच खरा निजद आहे. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या निर्णयाला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही, असे इब्राहिम यांनी जाहीर केले आहे. निजद हा पक्ष पूर्णपणे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व त्यांच्या कुटुंबीयांच्या नियंत्रणाखाली असलेला पक्ष आहे. या पक्षाचे पदाधिकारी कोणीही असले तरी शेवटी निर्णय गौडा कुटुंबीयांकडूनच घेतला जातो. सी. एम. इब्राहिम यांनी बोलाविलेल्या बैठकीला निजदचे सर्व 19 आमदार गैरहजर होते. त्यांच्या वक्तव्यावरून निजदमध्येही उभी फूट पडणार का? असा संशय निर्माण झाला आहे. आपल्याला भाजपला हरवायचे आहे. त्यामुळे आपला पाठिंबा काँग्रेसला राहणार, असे उघडपणे सांगणारे सी. एम. इब्राहिमही काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
या वेगवान राजकीय घडामोडींनी कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसमधील गटबाजी आणखी वाढणार, याची स्पष्ट लक्षणे दिसून येत आहेत. पाच राज्यातील निवडणुकांना सामोरे जात असताना व आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना राजकीय पक्षात सुरू असलेला संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. केवळ काँग्रेस-निजदमध्येच ही परिस्थिती आहे, असे नाही. भाजपची अवस्थाही जवळजवळ अशीच आहे. माजी मंत्री एम. पी. रेणुकाचार्य यांच्यासह अनेक नेते आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध उघडपणे भाष्य करू लागले आहेत. कर्नाटकात निवडणुका होऊन पाच महिने उलटले तरी अद्याप विरोधी पक्षनेतेपदावर कोणाचीच नियुक्ती झाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना उत्तर देणेही भाजप नेत्यांना कठीण जात आहे.
आता माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी व त्यांचे चिरंजीव निखिल कुमारस्वामी यांची निजदमधून हकालपट्टी केल्याचे पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. पक्षाध्यक्ष सी. एम. इब्राहिम यांनी आपल्या नावे खोटे पत्र तयार करून समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याची अज्ञाताविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे. कर्नाटकातील तीनही प्रमुख राजकीय पक्षातील लाथाळ्या चव्हाट्यावर येत आहेत. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध बेळगावात पडलेली ठिणगीचा पुढे वणवा होईल का? हे येणारा काळच सांगेल.








