पाय घसरून पडल्यास कायमस्वरुपी अपंगत्वाचा धोका
बेळगाव : अनगोळ येथील बडमंजीनगर परिसरातील गटारीचे बांधकाम मागील अनेक महिन्यांपासून ठप्प आहे. यामुळे शेतवडीत ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावर चिखल पसरला असून पाय घसरल्यास थेट अर्धवट स्थितीत असलेल्या गटारीच्या बांधकामामध्ये पडण्याची शक्यता आहे. या अर्धवट कामाला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बडमंजीनगरपासून रेल्वेरुळाच्या बाजूने गटारीचे बांधकाम करण्यात येत होते. यासाठी खोदाई करून त्यामध्ये लोखंडी बार घालून ठेवण्यात आले आहेत. परंतु, मागील अनेक दिवसांपासून काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही. यामुळे लोखंडी बार देखील गंजू लागले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात येथून ये-जा करणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक झाले होते. अनेक वेळा तक्रारी करून देखील महानगरपालिकेनेही शेतकऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष पुरविलेले नाही. अनगोळ परिसरातील शेतकऱ्याच्ंााr शेती बडमंजीनगरच्या बाजूला असल्याने येथील रस्त्यावरून ये-जा करावी लागते. परंतु, गटारीसाठी काढण्यात आलेली माती रस्त्यामध्ये टाकण्यात आली आहे. यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले असून काम केव्हा पूर्ण होणार, याची वाट शेतकरी पाहात आहेत.









