पूर्वभागातील शेतकरी द्विधा मन:स्थितीत : पाऊस लांबत चालल्याने वाढली चिंता
वार्ताहर /सांबरा
पावसाअभावी पेरणीची कामे खोळंबली असून पूर्वभागातील शेतकरी द्विधा मन:स्थितीत सापडले आहेत. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, मुतगे, शिंदोळी, बसरीकट्टी, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, पंत बाळेकुंद्री, मोदगा आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर धूळवाफ पेरणी केली जाते. पूर्व भागामध्ये एप्रिल-मे महिन्यात म्हणावे तसे वळिवाचे पाऊस झाले नाहीत. त्यामुळे पूर्व मशागतीची कामेही व्यवस्थित झाली नाहीत. अशातच आता पाऊस लांबत चालल्याने पेरणी करायची की नाही, तसेच पेरणी केल्यास भात उगवेल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग पूर्णत: द्विधा मन:स्थितीत सापडला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिका आहेत अशा काही शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र विहिरींनीही तळ गाठला असल्याने शेतीला पाणी सोडणे शेतकऱ्यांना कठीण होऊन बसले आहे. तर निम्म्याहून जास्त शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सूनच्या आगमनाबाबत संभ्रम वेधशाळेने अलीकडेच मान्सूनचे कर्नाटकात आगमन झाले असून महाराष्ट्र व गोव्यापर्यंत मजल मारल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी तुरळक पाऊस वगळता येथे पाऊस झालेला नाही. त्यामुळे मान्सून दाखल झालेला आहे की वेधशाळेकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे, असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वेधशाळेने नेमका मान्सून पाऊस केव्हा दाखल होणार आहे याची अचूक माहिती सांगावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरीवर्ग हैराण
पूर्व भागातील विहिरींनी व कूपललिकानी सध्या तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला व उसाला पाणी सोडणे कठीण होऊन बसले आहे. अशातच दिलेल्या वेळेतही हेस्कॉमकडून वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









