पिकेही कोमेजू लागली : कडोली परिसरातील शेतकरीवर्ग हवालदिल
वार्ताहर /कडोली
गेले पंधरा-वीस दिवस झाले पावसाने दडी मारल्याने माळरानाच्या शिवारातील बटाटे, रताळी, मका, भुईमूग आदी पिके कोमेजु लागली आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामातील पीक उत्पादन हंगाम वाया जाणार असल्याच्या शक्यतेने कडोली परिसरातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. पेरणीपुरता पोषक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी भरमसाठ खर्च करून बटाटे, रताळी, मका, भुईमूग पिकाची पेरणी केली. पिकांची उगवण चांगली झाली होती. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतू ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभीपासून पावसाने पूर्णपणे दडी मारली. त्यामुळे माळरानातील या सर्व पिकांनी आता माना खाली टाकायला सुरुवात केली आहे. सर्व पिके कोमेजु लागली असून माळरानातील शिवारात विशेष करून विहिरी, कूपनलिका नसल्याने पंपसेटने पाणी सोडणे देखील अवघड आहे. याठिकाणी पावसाशिवाय पर्याय नसून शेतकरी वर्ग आभाळाकडे नजरा रोखून आहे.
उत्पादनांवर परिणाम
फुल आणि फळधारणेवेळीच पावसाने दडी मारल्याने याचा उत्पादनांवर मोठा परिणाम होणार आहे. बटाटा लागवड करून पावणे दोन महिने ते दोन महिने पूर्ण होत असून आणखी 20 ते 25 दिवस पिकाची मुदत शिल्लक आहे. एखादेवेळी पाऊस आता लागला तरी या 20-25 दिवसात बटाटा कितपत मोठा होणार? त्यामुळे बटाटे पिकांची मजा गेली असून उत्पादनात मोठी घट होणार आहे. तर रताळी पिकांची हीच परिस्थिती आहे. एकदंरीत खरीप हंगामातील शेती व्यवसाय मोठ्या घाट्यात जाणार असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
भातपिके सुकु लागली, शेतकरी खंडित वीजपुरवठ्याने त्रस्त
पावसाचे प्रमाण कमी असले तरी पंपसेटच्या सहाय्याने भातपिके तरी पिकविता येतील, या शक्यतेने कडोली परिसरातील शेतकऱ्यांनी भात रोपाची लागवड केली आहे. परंतु वारंवार खंडित वीजपुरवठा होत असल्याने पंपसेटच्या सहाय्याने भात पिकांना पाणी देणे अवघड जात आहे. त्यामुळे भातपिकेही पाण्याअभावी सुकू लागली आहेत. भात शिवारात मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. परिणामी खंडित वीजपुरवठ्याचा फार मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सुरळीत वीजपुरवठा करावा यासाठी वीजमंडळाला निवेदने देण्यात आली. मोर्चा काढण्यात आला, पण सुरळीत वीजपुरवठा काही होईना. तेव्हा आता काय करायचे? सर्व मदार आता पावसावर असून शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.









