कृषी खात्याकडे साठा पडून : पावसानंतर वाढणार मागणी
बेळगाव : पावसाअभावी बी-बियाणे आणि खतांची मागणी थंडावली आहे. रयत संपर्क केंद्र, कृषी पत्तीन संघ आणि खासगी दुकानांतून बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके पडून असल्याचे दिसत आहेत. पावसाला सुरुवात झाल्यानंतरच बी -बियाणांच्या मागणीत वाढ होणार आहे. कृषी खात्याने यंदा जिल्ह्यात 7.10 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार बी-बियाणे, खताचा योग्य तो साठा केला आहे. मात्र पावसाअभावी सर्व साठा जाग्यावर पडून आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर याची उचल होणार आहे. दरवर्षी खरिप हंगामाला प्रारंभ झाला की, बी-बियाणे, खतांच्या मागणीत मोठी वाढ होते. यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने मागणी काहीशी थंडावली आहे. मात्र पावसाला सुरुवात होताच बी-बियाणे आणि खताच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडणार आहे. मात्र कृषी खात्याकडे आवश्यक बी -बियाणे नसल्याने यंदादेखील शेतकऱ्यांची भिस्त खासगी दुकानांवरच अवलंबून आहे. जिल्ह्यात रयत संपर्क केंद्र आणि पीकेपीएस संघाची संख्या मोठी आहे. मात्र त्याठिकाणी बी-बियाणे आणि खते उपलब्ध नसतात. त्यामुळे शेतकऱ्यांची ऐन हंगामात गैरसोय होते. दरम्यान, हंगाम साधण्यासाठी शेतकरी असेल ते दर देऊन खासगी दुकानातून बी-बियाणे खरेदी करतात. दरम्यान काही ठिकाणी अधिक दरानेदेखील बी-बियाणे, खतांची विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो. यासाठी स्थानिक शिवारात लागणारी बी-बियाणे आणि खते उपलब्ध करावीत, अशी मागणी होत आहे. कृषी खात्याच्या रयत संपर्क केंद्र आणि पीकेपीएसमध्ये अनावश्यक बी-बियाणांचा भरणा असल्याने शेतकऱ्यांना खासगी दुकानांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. कृषी खात्याने आवश्यक तो सर्व्हे करून बी-बियाणे उपलब्ध करावीत, अशी मागणी होत आहे.









