पावसापासून कच्चा माल-वीटभट्टी बचावासाठी प्लास्टिक-ताडपत्रीचा वापर
वार्ताहर /गुंजी
गुंजी परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक पाऊस सुरू झाल्याने या परिसरातील वीट उत्पादकांची धावपळीने तारांबळ उडाली. सध्या या परिसरात वीटभट्टी लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर काही वीट उत्पादक अद्यापही वीट उत्पादन करीत आहेत. दरवर्षी शिमगोत्सवापर्यंत या परिसरात हा व्यवसाय मोठ्याप्रमाणात केला जातो. मात्र यावर्षी सुरुवातीसही पावसामुळे वीट उत्पादनास विलंबाने सुरुवात करण्यात आली होती. आणि सध्याही पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने यावर्षी वीट उत्पादनाचा कालावधी कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी या भागात वीट उत्पादन कमी होण्याची शक्यता उत्पादकांतून वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसापासून या परिसरात ढगाळ वातावरण होते. मात्र शुक्रवारी दुपारी पावसास प्रारंभ झाल्याने येथील वीट उत्पादकांची प्रचंड धांदल उडाली. कच्चा माल आणि वीटभट्ट्या झाकण्यासाठी ताडपत्री, प्लास्टिक, गवताचे आच्छादन वापरून वीट उत्पादकांनी पावसापासून कच्चा माल सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ अर्ध्या तासाचा पावसाचा शिडकावा बंद झाल्याने येथील वीज उत्पादकांनी चिंतेचा नि:श्वास सोडला.
शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची गरज
पावसामुळे येथील वीट उत्पादकांना धास्ती वाटत असली तरी येथील शेतकऱ्यांना आणि काजू बागायतदारांना पावसाची नितांत गरज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. कारण यावर्षी या भागात अत्यल्प पाऊस झाल्याने नदी नाल्यांचे पाणी आटले आहे. शेतवडीतील विहिरींनी तळ गाठला असून पिकांना आणि पाळीव प्राण्यांना पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे सध्या पाऊस झाल्यास आंबा, काजू आणि शेतकऱ्यांच्या पाळीव प्राणी व पिकांना आणी शेती मशागतीस उपयुक्त ठरणार असल्याचे बोलले जात आहेत.









