सावळज :
सावळज परिसरात गेली महिनाभर पडत असलेल्या पावसामुळे द्राक्ष शेती धोक्यात आली आहे. ढगाळ वातावरण, धुके व सातत्याने होणारा पाऊस अशा खराब वातावरणामुळे द्राक्ष बागेत दावण्या व करपा रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे रोगांच्या प्रादुर्भावामुळे पुढील पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सावळज परिसरात गेली महिनाभर झाले पाऊस वारंवार हजेरी लावत आहे. कधी पाऊस, ढगाळ वातावरण तर कधी धुके यामुळे करपा व दावण्या रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. एप्रिल छाटणीनंतर द्राक्ष वेलींना स्वच्छ सूर्यप्रकाश व उष्णतेची आवश्यकता असते. मात्र खराब वातावरणामुळे द्राक्ष बागा रोगांना बळी पडू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी महागडी औषधे फवारणी करु लागला आहे. मात्र पावसामुळे द्राक्ष बागेतील चरीत गुडघाभर पाणी साचल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे चिखलात औषध फवारणीचे ट्रॅक्टर अडकत असल्याने फवारणीस अडचणी येत आहेत.
सततच्या खराब वातावरणामुळे द्राक्ष वेलीच्या काड्या तयार होण्यास अडचणी येत आहेत. अशातच रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या दुहेरी संकटामुळे द्राक्ष बागा धोक्यात आल्या आहेत. दरवर्षी द्राक्ष बागेच्या खरड छाटणीनंतर पाण्याची टंचाई निर्माण होत होती. मात्र चालू वर्षी अती पावसामुळे द्राक्ष शेती धोक्यात आली आहे. बागेवरील रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. पावसामुळे द्राक्ष बागेची कामे ही खोळंबली आहेत. त्यामुळे खराब वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या कामाचे वेळापत्रक कोलमडले आहे.








