आजी-माजी नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय : सीमाभागातील जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
राजहंसगडावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्याच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय आजी-माजी नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच सर्वांनी एकत्र येवून हा सोहळा यशस्वी करण्याचे ठरविण्यात आले. सीमाभागातील जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आजी-माजी नगरसेवकांची बैठक माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. यावेळी राजहंसगडावर होणाऱ्या कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मूर्तीला मराठी भाषिकांच्यावतीने दुग्धाभिषेक घालण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला असून रविवार दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता सर्व आजी-माजी नगरसेवकांनी तसेच माजी महापौर-उपमहापौरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी केले. हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे मनोगत यावेळी आजी-माजी नगरसेवकांनी व्यक्त केले. सर्व आजी-माजी नगरसेवकांनी कार्यक्रमाला पाठींबा व्यक्त करून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.
शहर म. ए. समितीच्या बैठकीत झालेल्या वादावादीच्या आणि आरोप-प्रत्यारोपाच्या घटनेबद्दल माजी महापौर किरण सायनाक, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, अॅड. रतन मासेकर, राजू बिर्जे आदींसह माजी नगरसेवकांनी खंत व्यक्त केली. विखुरलेल्या मराठी भाषिकांना एकत्रित करून लढा देण्यासाठी एकीची प्रक्रिया सुरू असताना असे प्रकार करणे निंदनीय असल्याचे मत माजी नगरसेवकांनी व्यक्त केले. तसेच असे प्रकार घडू नयेत, यादृष्टीने सर्वांनी विचार करावा, असे मत व्यक्त करण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीच्या भूमिकेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. केवळ मराठी नव्हे तर अन्य भाषिकांनादेखील म. ए. समितीने एकच उमेदवार द्यावा, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे. तसेच उमेदवार निवड करण्यासाठी एकतर्फी निवड समितीची स्थापना करू नये. आजी-माजी नगरसेवकांना विश्वासात घेऊन निवड समितीची स्थापना करून उमेदवार निवडीची प्रक्रिया राबवावी, असे मनोगत आजी-माजी नगरसेवकांनी व्यक्त केले.
बैठकीला माजी नगरसेवक नेताजी जाधव, माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी उपमहापौर रेणु किल्लेकर, संजय शिंदे, रेणु मुतकेकर, प्रकाश शिरोळकर, नगरसेवक रवि सांळुके, शिवाजी मंडोळकर, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, राकेश पलंगे, रेडेकर, सुनील बाळेकुंद्री, सुधा भातकांडे, मेघा हळदणकर, वर्षा आजरेकर, किशोरी कुरणे, निलिमा पावशे, ऍड. अमर येळळूरकर, अनिल पाटील, माजी महापौर आप्पासाहेब पुजारी यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.









