वेंगुर्ले (वार्ताहर)-
प्रियांशु सांस्कृतिक संस्था पर्वरी, कला व संस्कृती खाते गोवा तथा इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेश व शशिकांत डुबळे स्मृती अकरावे शास्त्रीय संगीत संमेलन उत्साहात पार पडले.मूळ वेंगुर्ल्याच्या सुकन्या डॉ. शिल्पा डुबळे परब यांनी या शास्त्रीय संगीत संमेलनाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्य संस्कृती पुरस्कार विजेते गुरुवर्य दामोदर शेवडे, इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझाचे मेंबर सेक्रेटरी अशोक परब, तसेच विशेष अतिथी पद्मजा जोशी, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे व डॉ. शिल्पा डुबळे-परब यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करून दिली. या सांगीतिक कार्यक्रमात ऋषिकेश फडके यांचे तबला एकलवादन झाले. त्यांनी पंचमसवारी हा ताल उत्कृष्टपणे सादर केला. कर्नाटक येथील मेधा भट यांनी राग मारवा अणि मिश्व देसमध्ये दादरा सादर करून रसिकांची मने जिंकली. डॉ. प्रवीण गावकर यांनी राग बागेश्री खूप सुंदर रित्या सादर केला. साथसंगत संकेत खलप, गोपीनाथ गावस, अनुराग देसाई, वासिम खान व डॉ. उदय कुलकर्णी यांनी केली. या कार्यक्रमाचे सुरेख असे निवेदन नेहा उपाध्ये यांनी केले व आभार सौ. विभा प्रभूदेसाई यांनी मानले. या कार्यक्रमाला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.









