सलग दुसऱ्या सामन्यात रहाणे शुन्यावर बाद
वृत्तसंस्था/ थुंबा, तिरुअनंतपूरम
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याच्यासाठी रणजी ट्रॉफीचा हा मोसम फारसा चांगला जात नाही. मुंबईकडून खेळताना तो आत्तापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. अजिंक्य रहाणे सलग दोन सामन्यांत खाते न उघडता पहिल्याच चेंडूवर बाद झाला. सर्वप्रथम तो आंध्रविरुद्धच्या सामन्यात गोल्डन डकचा बळी ठरला. यानंतर केरळविरुद्धच्या सामन्यातही तो पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. केरळविरुद्ध लढतीत मुंबईचा पहिला डाव 251 धावांवर संपुष्टात आला.
मुंबईचा कर्णधार रहाणेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा निर्णय योग्य ठरला नाही आणि संघाने एकही धाव न करता दोन विकेट्स गमावल्या. जय बिश्ता आणि रहाणे खाते न उघडताच बाद झाले. दोघेही पहिल्याच चेंडूवर बाद झाले. रहाणेला टीम इंडियात परतायचे आहे. पण दुसरीकडे त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीत. रणजी ट्रॉफीत केरळविरुद्ध तो गोल्डन डकवर बाद झाला. याआधीच्या सामन्यात आंध्रविरुद्धही तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर क्रीजवर आलेला रहाणे बासिल थम्पीचा बळी ठरला. यष्टिरक्षक संजू सॅमसनने त्याचा झेल घेतला. यानंतर भुपेन लालवाणीने 63 चेंडूत 50 तर शिवम दुबेने 72 चेंडूत 51 धावा केल्या. याशिवाय, तनुष कोटियानने 6 चौकारासह 56 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केल्याने मुंबईचा पहिला डाव 78.4 षटकांत 251 धावांवर आटोपला. केरळकडून श्रेयस गोपालने सर्वाधिक 28 धावांत 4 गडी बाद केले. तर बासिल थम्पी व जलज सक्सेनाने प्रत्येकी दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
संक्षिप्त धावफलक : मुंबई पहिला डाव 78.4 षटकांत सर्वबाद 251 (लालवाणी 50, शिवम दुबे 51 कोटियान 56, प्रसाद पवार 28, श्रेयस गोपाल चार बळी).









