वृत्तसंस्था/ बेंगळूर
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाचा कर्णधार फॅफ डु प्लेसिसने क्रिकेट टी-20 प्रकारात षटकारांचे त्रिशतक पूर्ण केले. 38 वर्षीय डु प्लेसिसने हा विक्रम सोमवारी येथे झालेल्या लखनौ सुपरजायंट्सच्या सामन्यात नोंदवला.
बेंगळूर आणि लखनौ यांच्यातील हा सामना दर्जेदार झाला. दोन्ही संघांकडून तुफान फटकेबाजीने प्रेक्षक खूष झाले. या सामन्यात डु प्लेसिसने 46 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारासह नाबाद 79 धावा झळकवल्या. डु प्लेसिसने या सामन्यात 5 षटकार खेचल्याने त्याची टी-20 या क्रीडा प्रकारातील षटकारांची संख्या 301 झाली आहे. टी-20 प्रकारात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांच्या यादीत विंडीजचा ख्रिस गेल पहिल्या (1056 षटकार), विंडीजचा माजी अष्टपैलू किरॉन पोलार्ड (812), विंडीजचा अष्टपैलू आंद्रे रसेल (589), न्यूझीलंडचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज ब्रेन्डॉन मेकॉलम (485), न्यूझीलंडचा कॉलीन मुन्रो (480) यांचा समावेश आहे. भारताचा रोहित शर्मा 462 षटकारासह सहाव्या, विराट कोहली 360 षटकारासह सातव्या, सुरेश रैना 325 षटकारासह आठव्या, के. एल. राहुल 289 षटकारासह नवव्या आणि रॉबिन उथप्पा 237 षटकारासह दहाव्या स्थानावर आहे.









