प्रतिनिधी / चिकोडी
चिकोडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) गोपाळकृष्ण गौडर यांना प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून त्याचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने केंद्र सरकारकडे पाठविलेल्या चांगल्या कामगिरीच्या अहवालानुसार शनिवारी केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील कर्तव्यदक्ष 21 पोलीस अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर केले आहे.
बेळगाव जिह्यातून एकमेव गोपाळकृष्ण गौडर यांना हे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. 14 ऑगस्ट 2024 रोजी गौडर यांना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री पदक जाहीर झाले होते. आता मुख्यमंत्री पदकापाठोपाठच त्यांना राष्ट्रपती पदकही जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विजापूर जिह्यातील तिकोटा तालुक्यातील होनवाड येथील मूळचे रहिवासी असलेले गौडर गेल्या 27 वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांनी या कालावधीत 7 वर्षे पोलीस उपनिरीक्षक, 12 वर्षे मंडल पोलीस निरीक्षक, तर सहा वर्षांपासून पोलीस उपअधीक्षक पदावर सेवा बजावत आहेत. यापूर्वी त्यांनी चिकोडी येथे मंडळ पोलीस निरीक्षक म्हणूनही सेवा केली आहे. सध्या चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.









