ऑनलाईन टीम / मुंबई :
ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी अटकेत असलेले डीएसके ग्रुपचे प्रमुख दीपक कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी आणि कुटूंबीय यांच्याविरोधात दाखल असलेल्या खटल्यात त्यांच्या पत्नीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणात दीपक कुलकर्णी यांना मात्र, जामीन देण्यासाठी न्यायालयाने नकार दिला आहे.
या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये वकील अशुतोष श्रीवास्तवा यांनी कुलकर्णी यांची बाजू मांडली. 2018 पासून कुलकर्णी कुटुंबातील अनेकांना या फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगामध्ये ठेवण्यात आले आहे. आजच्या निर्णयानंतर हेमंती यांची तुरुंगातून जामीनावर सुटका होणार आहे. मात्र याचवेळी न्यायालयाने डी.एस.के यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शुक्रवारी या प्रकरणामध्ये न्या. डी. पी. नाईक यांच्यासमोर सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आता हेमंती यांना जामीन मिळाला असला तरी डी. एस. के यांच्या जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज करणार असल्याची माहिती श्रीवास्तवा यांनी दिली.
दरम्यान, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थक गुन्हे शाखेने मे 2018 मध्ये डी. एस. कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी व सर्व संबंधितांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. याबाबत ऑगस्ट 2018 मध्ये पुरवणी आरोपपत्रही दाखल करण्यात आलेले आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयाने मध्यंतरी कुलकर्णी यांचे बंधू मकरंद यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती यांचा जामीन अर्ज जून महिन्यामध्ये विशेष न्यायालयाने फेटाळून लावला होता. 2017 मध्ये ठेवीदाराने केलेल्या तक्रारीनंतर डीएस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. दोषारोपपत्रात कुलकर्णी यांनी ठेवीदारांची 2 हजार 43 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या विरोधात 33 हजार ठेवीदारांनी तक्रारी दिल्या आहेत. सर्व आरोपींना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे.