पावसाच्या पाण्याने आंघोळीची वेळ : उत्सवातील भांडीही धुतली पावसाने,गणेशोत्सवात पाण्यासाठी लोकांचे हाल
पणजी : राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच पावसानेही अक्षरश: कहर माजविला आहे. अविश्रांत धो धो कोसळणाऱ्या या पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि सर्वत्र असे एकूण चित्र असताना फोंडा तालुक्यातील काही परिसर तसेच तिसवाडी तालुक्यातील नळ मात्र कोरडे पडले आहेत. त्यामुळे ‘चहुकडे पाणी, पण पिण्यासाठी थेंबही नाही’, असे चित्र या दोन्ही तालुक्यांच्या बहुतेक भागात अनुभवास आले आहे. ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पुरवठा क्षेत्रात येणाऱ्या अनेक भागात नागरिकांवर ही परिस्थिती ओढविली असून त्याचा फटका तिसवाडी तालुका व फोंडा तुलक्यातील काही परिसरासह सांखळी मतदारसंघातील काही भागांनाही बसल्याची माहिती मिळाली आहे.
पावसाचे पाणी वापरण्याची पाळी
ऐन गणेशचतुर्थीत धड जेवण रांधण्यासाठी सुद्धा पाणी मिळाले नाही. अशा परिस्थितीत आंघोळ आणि अन्य विधीसाठी तर ते मिळणे शक्यच नव्हते. त्या परिस्थितीवर उपाय म्हणून काही नागरिकांनी चक्क घराच्या पागोळ्यातून पडणारे पावसाचे पाणी जमवून आंघोळीसाठी वापरून कसेबसे दिवस ढकलले असल्याची माहिती मिळाली आहे.
ऐन चतुर्थीत पाण्याअभावी हाल
या परिस्थितीमुळे लोकांची विवंचना वाढली असून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासंबंधी काही नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, साबांखातील अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करण्यात आले, मात्र तेही अल्प प्रमाणात मिळाल्याने लोकांचे हाल झाले. त्यामुळे सरकारच्या नावाने बोटे मोडण्याशिवाय लोकांकडे पर्याय राहिला नाही.
बाहेर धो धो, नळात नाही थेंब
चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी तिसवाडीतील अनेक भागांत कमी पाणी मिळाले. तिसऱ्या दिवशी तर एकदमच घात झाला. एक थेंबही पाणी लोकांना मिळाले नाही. मात्र धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याने लोकांनी आंघोळ कशीबशी उरकून घेतली, भांडी घासली. कपडे धुणे मात्र पुढे ढकलण्यात आले, असे अनेक गृहीणींनी सांगिले.
ओपा प्रकल्पात प्रयत्न जारी
ही समस्या लक्षात घेऊन ओपा प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी बुधवारी तेथील 8 एमएलडी क्षमतेचा एक प्रकल्पच बंद केला आहे. गढुळपणा कमी झाल्यानंतर हा प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. या दरम्यान तेथील कर्मचाऱ्यांनी 40 एमएलडी, 27 एमएलडी आणि 54 एमएलडी क्षमतेच्या प्लांटमधील फिल्टर्स स्वच्छ केले आहेत. त्यातील काही फिल्टर्स एकापेक्षा जास्त वेळी साफ करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
ओपा जल प्रकल्पातील फिल्टर्स तुंबले
प्राप्त माहितीनुसार ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणीपुरवठा करणाऱ्या खांडेपार नदीला पूर आल्यामुळे सर्व पाणी गढूळ झाले आहे. हे पाणी गाळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बसविण्यात आलेले फिल्टर्स वारंवार तुंबत असल्याने प्रकल्पाला योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. त्याचा थेट परिणाम फोंडा व तिसवाडी तालुक्यांतील लोकांच्या पाणी पुरविण्यावर झाला आहे.









