सातारा :
शाहुपूरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला प्रतिक संतोष दळवी (वय 22) याने दि. 1 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता सदरबाजारात एका अपार्टमेंटमध्ये धिंगाणा घातला. तो दारु पिवून दोन तीन मित्रांसह तंबाखू, गुटखा खावून थुंकत असल्याने एका कुटुंबाने रोखले असता त्याने त्या घरातील दोन महिलांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. घराच्या दाराची तसेच गाडीची काच फोडून नुकसान केले. त्यावरुन सातारा शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 33 वर्षाच्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सध्या शाहुपूरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला प्रतिक दळवी हा त्याच्या दोन तीन मित्रासमवेत दारु पिवून गुटखा, तंबाखू खावून थुंकून परिसर घाण करत होते. रात्रीच्या 11 वाजता हा प्रकार सुरु होता. त्यामुळे त्या महिलेच्या पतीने येथे घाण करु नका अशी विनंती त्यांना केली असता प्रतिकने शिवीगाळ करत त्या महिलेची लावलेल्या कारकडे गेला. एक मोठा दगड प्रतिकने उचलून कारच्या उजव्या बाजूच्या मागच्या दारावर टाकून दोन्ही काचा फोडून टाकल्या. त्याने सुमारे 60 हजार रुपयांचे गाडीचे नुकसान केले. तसेच त्याने दरवाजावर लाथा मारुन दरवाजा उघडला. घरात दगड हातात घेवून मारण्यासाठी धावून येत होता. त्याला दोन महिलांनी अडवत त्याच्या हातातील दगड काढून घेतला असता शिवीगाळ करत मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन त्या महिलेच्या पतीला मारहाण केली. त्यावरुन त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी हे करत असून घटनास्थळी डीवायएसपी राजीव नवले यांनी भेट दिली आहे.








