एअर होस्टेससोबत गैरवर्तन ः 2 जणांना अटक
वृत्तसंस्था/ पाटणा
दिल्ली-पाटणा इंडिगो फ्लाइटमध्ये तीन युवकांनी मोठा गोंधळ घातला आहे. या तिन्ही मद्यधुंद प्रवाशांना एअर होस्टेसने समजाविण्याचा प्रयत्न केला असता ते तिच्याशीच गैरवर्तन करत होते. या तिघांनी विमानाच्या चालक दलाच्या एका सदस्याला मारहाण देखील केली आहे. यासंबंधीची लेखी तक्रार वैमानिकाने पाटणा विमानतळावरील पोलीस स्थानकात केली आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

तिन्ही युवकांनी विमानप्रवास सुरू होताच गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. एअर होस्टेसने गोंधळ घालू नका असे समजाविण्याचा प्रयत्न केला असता ते वाद घालू लागले. तिन्ही आरोपी बिहारचे रहिवासी आहेत. या मद्यधुंद प्रवाशांमुळे अन्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. या घटनेची माहिती वैमानिकाने विमानतळ प्राधिकरण तसेच सीआयएसएफला दिली होती. यामुळे संबंधित प्रवाशांना विमानतळाबाहेर पडण्यापूर्वीच रोखण्यात आले. परंतु एक प्रवासी तेथून पसार होण्यास यशस्वी ठरला आहे.
दिल्लीहून पाटणा येथे जात असलेल्या 6ई 6383 फ्लाइटमध्ये झालेल्या घटनेसंबंधी अधिकाऱयांकडून चौकशी केली जात आहे. विमानातील चालक दलांकडून कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला नव्हता, सोशल मीडियावर काही जणांकडून यासंबंधी अफवा पसरविल्या जात असल्याचे इंडिगोने म्हटले आहे.









