फोडलेल्या बाटल्यांच्या काचांमुळे शेतकऱ्यांना धोका
बेळगाव : आंबेवाडी मार्कंडेय नदीकाठी असलेल्या शिवारात तळीरामांचा उपद्रव वाढला आहे. दारू ढोसून रिकाम्या बाटल्या शिवारात फेकल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस खात्याने ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. परिसरातील शिवारात मद्यप्राशन करून तळीराम बाटल्या फोडत आहेत. शिवाय प्लास्टिक पत्रावळ्या, ग्लास फेकून देत आहेत. त्यामुळे शिवारात कचरा होऊ लागला आहे. फोडलेल्या बाटल्यांच्या काचा पायाला लागून इजा होऊ लागल्या आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची शिवारात वर्दळ वाढली आहे. मात्र, फोडलेल्या बाटल्यांमुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण होऊ लागला आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर असलेल्या दारू दुकानातून हे तळीराम मद्य विकत घेऊन शिवारात निवांत ठिकाणी तळ ठोकत आहेत. दारुच्या नशेत बाटल्या फोडत आहेत. शिवाय इतर टाकाऊ पदार्थ देखील जाग्यावर फेकून देत आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हे मद्यपी धिंगाणा घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होऊ लागले आहे. तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्राम पंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही शेतकरी करत आहेत.









