बाणस्तारी येथे केला होता भीषण अपघात : सहा वाहनांच्या अपघातात 3 ठार, 3 जखमी,मद्यपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
फोंडा : फोंडा-पणजी महामार्गावर रविवारी रात्री बाणस्तारी पुलावर मद्यधुंद अवस्थेत जाणूनबुजून आणि निष्काळजीपणे वाहन हाकून तिघांचे बळी घेऊन पसार झालेल्या मर्सिडीज कारचालकाला म्हार्दोळ पोलिसांनी पणजीतून काल सोमवारी अटक केली. श्रीपाद उर्फ परेश सिनाई सावर्डेकर (वय 48, रा. अनंत निवास, हॉटेल विवांताजवळ, पणजी) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर भा.दं.सं.च्या 279, 304, 337, 338 कलमांखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायलयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला असून त्याची रवानगी दोन दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
म्हार्दोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परेश सावर्डेकर हा आपली पत्नी व तीन मुलांसह (दोन मुलगे एक मुलगी) रविवारी ओपा खांडेपार येथील नंदनवन फार्म हाऊसमध्ये गेला होता. रोटरी क्लबतर्फे आयोजित सोहळा उरकून फोंडा-मंगेशीमार्गे पणजी येथे घरी जात असताना रात्री 8 वा. सुमारास बाणस्तारी पुलावर हा अपघात घडला. अपघातात तिघाजणांचा मृत्यू झाला आहे. सुरेश फडते (58, दिवाडी, तिसवाडी), भावना फडते (52,दिवाडी), अनुप कर्माकर (26, रा. उंडीर बांदोडा, मूळ पं. बंगाल) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच वनिता भंडारी (21, सांताव्रुज फोंडा), शंकर हळर्णकर(67, बाणस्तारी), राज माजगावकर (27, ताळगांव) अशी तिघा जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
बाणस्तारी पुलाजवळ विरूद्ध दिशेने मार्गक्रमण करीत असताना या मर्सिडीज कारने जीए 07 डी 3285 या दुचाकीला ठोकरल्याने सुरेश विनायक फडते जागीच ठार झाले. मागे बसलेली त्याची पत्नी भावना सुरेश फडते खोल खाईत फेकली गेली. सुमारे 1 तासानंतर तिच्या मृतदेहाचा शोध लागला होता. त्यानंतर अनुप कर्माकार याच्या यामाहा जीए 05 व्ही 4331 दुचाकीला ठोकरली. त्याच्या पाठिमागे बसलेली युवतीही गंभीर जखमी झाली आहे. तसेच अल्टो कार जीए 05 बी 3211, दुसरी अल्टो जीए 06 ए 1538, चालक आणि प्रवासी राज माजगांवकर, रोहिदास हळर्णकर (67, बाणस्तारी), याला गंभीर दुखापत झाली आहे. संशयिताला पहाटे 4 वा. अटक करण्यात आले. याप्रकरणी म्हार्दोळ पोलीस अधिक तपास करीत आहे. या अपघातात मर्सिडीज, डिस्कव्हर, यामाहा, दोन अल्टो, एक स्विफ्ट अशा एकूण सहा वाहनांचा समावेश आहे.
प्रेन्डशिप डे उरकून परतताना तिघांना चिरडले
परेश सावर्डेकर हा आपली पत्नी मेघना तसेच तीन मुलांसमवेत ओपा खांडेपार येथील नंदनवन फार्ममध्ये रोटरी क्लबच्या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी 30 जणांचा गट सहभागी झाला होता. अपघाताच्यावेळी संशयिताच्या मर्सिडीज कारगाडीत दोन बियरच्या रिकाम्या बाटल्या तसेच दारूमिश्रित पाण्याच्या दोन बाटल्या सापडलेल्या असून पतीपत्नीने दारूचे सेवन केल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक आशिष शिरोडकर यांनी दिली. मद्यधुंद अवस्थेतील हा चालक व त्याची पत्नीही रविवारी रात्री ग्रामस्थांशी हुज्जत घालत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली होती, तरी जमावाने संयम राखला होता.
म्हार्दोळ लॉकअपमध्ये पहिला ‘पाहुणा’ मद्यपी उद्योगपती
म्हार्दोळ पोलीस स्थानकाच्या अलीकडेच झालेल्या उद्घाटनानंतर पहिला संशयित आरोपी म्हणून लॉकअपमध्ये या मद्यपी उद्योगपतीची वर्णी लागली आहे. मद्यधुंद अवस्थेत तिघा जणांना चिरडल्यामुळे त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अपघातावेळी त्याने सुमारे 94 एमजी दारूचे सेवन केल्याचे आढळले आहे. दारू सेवनाची मर्यादा फक्त 30 एमजी अशी आहे. निष्काळजीपणे वाहन हाकून तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याची म्हार्दोळच्या या नव्या कोऱ्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
बाबांबरोबर आईसुद्धा आहे…
या अपघातातील मयतांपैकी फडते दांपत्य हे तिसवाडी तालुक्यातील दिवाडी बेटावरील आहे. त्यांचा मुलगा साहिल फडते हा पोलीस खात्यात क्राईम विभागात कॉन्स्टेबल फोटोग्राफर म्हणून कार्यरत आहे. त्याला वडिलांचा अपघात झाल्याचे कळविण्यात आले, तेव्हा त्याने वडिलांबरोबर आई असल्याचेही सांगितले. त्यानंतर साधारण तासाभरानंतर खोल खाईत तिचा शोध घेण्यात आला, तेव्हा मृतदेह सापडला.
फेरीबोटमध्ये मायबाप-लेकाची भेट ठरली शेवटची!
वास्को येथील खूनप्रकरणी तपासकामाच्या टिममध्ये साहिल याचा समावेश होता. त्यामुळे दुपारी तो ड्युटीवर जाताना त्याचे आईवडील दुपारी घरी परतत असताना दिवाडी फेरीबोटमध्ये त्यांची भेट झाली होती, तीच मायबाप लेकाची अखेर शेवटची भेट ठरली. दिवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पुत्र साहिल व कॉलेजात शिकणारी मुलगी असा परिवार आहे. दुसरा मयत दुचाकीचालक अनुप कर्माकर याचा मृतदेह त्याच्या भावाच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
मर्सिडीज वाहन कोण चालवित होता हाच मोठा गुंता
अपघातानंतर मर्सिडीजचा मद्यपी चालक परेश कसाबसा गाडीतून बाहेर पडला आणि गाडीत असलेल्या आपल्या तिन्ही मुलांना बाहेर काढून पाठीमागे येत असलेल्या आपल्या साथीदाराच्या गाडीतून घरी नेण्यासाठी पाठविले. यावेळी त्याची पत्नी गाडीमध्ये अडकली होती. ती गाडीतून बाहेर पडत असतानाच तिने जमावाशी हुज्जत घालण्यास प्रारंभ केला. ती उद्धटपणे जमावाकडे वागल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. तिघांना चिरडल्यानंतरही कोणताही पश्चाताप त्यांच्यापैकी कुणाच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हता.
पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांनी परेश सावर्डेकर हा मर्सिडीज चालवित असल्याची माहिती दिली आहे. स्थानिक व अपघातास्थळी जमलेल्या लोकांनी मर्सिडीजच्या ड्रायव्हींग सीटवर महिला बसलेली आढळल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. एका इसमाने आपण स्वत: या घटनेचा साक्षीदार असल्याची क्लीप सर्वत्र व्हायरल केल्यामुळे पोलिसांचा तपास योग्य दिशेने आहे की धनाढ्या संशयिताला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असा संशय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. बाणस्तारी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी वाहनचालकाला अटक करा असा पवित्रा घेत आपला मोर्चा रविवारी उशिरा रात्री म्हार्दोळ पोलीस स्थानकावर वळविला होता. मात्र तोपर्यंत संशयिताला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांचा रागाचा पारा उतरला होता. याप्रकरणी पोलीस अधीक्षक बोस्टन सिल्वा यांनी घटनास्थळी भेट दिली असून उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन गावडे, उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर, विनोद साळुंके व म्हार्दोळ पोलीस अधिक तपास करीत आहे.









