खेड :
खाडीपट्ट्यातील बहिरवली मार्गावर मद्यप्राशन करून बस चालवत सवणसनजीक घडलेल्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी खेड–पन्हाळजे बसफेरीचा चालक मंगेश आहाके याच्यावर अखेर एसटी प्रशासनाने 3 महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिली.
23 मार्च रोजी सायंकाळच्या 6 च्या सुमारास चालक मंगेश आहाके व वाहक गजानन केंद्रे हे दोघेजण खेड–पन्हाळजे (एम.एच. 14 बी.डी. 2597) बसमधून प्रवाशांना घेवून पन्हाळजेच्या दिशेने जात असताना समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिली होती. या अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते निसार सुर्वे यांनी बस चुकीच्या बाजूने येत असल्याचे निदर्शनास येताच बस थांबवून चालक व वाहकास धारेवर धरले होते. या दरम्यान, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्रकार निसार सुर्वे यांनी उघडकीस आणला होता. या प्रकारानंतर प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या चालकाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार एसटी प्रशासनाने गंभीर दखल घेत चालकाची सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खाडीपट्ट्यात धावणाऱ्या बसफेऱ्यांवर मद्यधुंद अवस्थेतील चालक पाठवून प्रवाशांच्या जीविताशी खेळ करू नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निसार सुर्वे व खाडीपट्ट्यातील ग्रामस्थांनी केली आहे.








