रामतीर्थनगरात खून : दोन मुलांसह पत्नीचा पलायनाचा प्रयत्न
प्रतिनिधी/ बेळगाव
पत्नीने ओढणीने पतीचा गळा आवळून खून केला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर रामतीर्थनगर येथे ही घटना घडली असून पतीच्या खुनानंतर आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन घराला कुलूप लावून बाहेर पडलेल्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नशेत झालेल्या भांडणानंतर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमित निजाप्पा रायबाग (वय 34) मूळचा राहणार कब्बूर, ता. चिकोडी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याची पत्नी आशा रायबाग (वय 29) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
खून झालेला अमित चिकोडी तालुक्यातील कब्बूरचा तर आशाचे माहेर रायबाग तालुक्यातील हिडकल येथे आहे. या दांपत्याला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. लग्नानंतर हे कुटुंब बेळगावात रहात होते. अमित टीव्ही रिपेरी करीत होता तर आशा खासगी प्रिंटींग प्रेसमध्ये कामाला जात होती. अमितला दारूचे व्यसन जडले होते. याच कारणावरून पती-पत्नींमध्ये अधूनमधून भांडणे व्हायची.
यापूर्वी आशाने पती अमितविरुद्ध माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्याला बोलावून समज दिली होती. प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत त्याच्यावर कारवाईही केली होती. भांडण सुरू झाले, पती अंगावर धावून आला तर पत्नी 112 ला फोन करायची. शुक्रवारी रात्री उशिरा पती-पत्नीमध्ये भांडण झाले. भांडणानंतर पत्नीने ओढणीने गळा आवळून पतीचा खून केल्याचे पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी सांगितले. खुनानंतर आशाने घरातील सर्व साहित्य बाहेर ठेवले होते. साहित्यासकट पलायनाचा तिचा विचार होता. आता पोलीस आपल्याला अटक करणार, या भीतीनेच तिने घर सोडले होते, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
अन् दोन्ही मुले झाली अनाथ
शुक्रवारी मध्यरात्री बारानंतर ही घटना घडली आहे. अमित व आशा यांच्यात जोरात भांडण झाले आहे. भांडणानंतर आशाने अमितचा गळा आवळला. त्यावेळी तो नशेत होता. त्याच्या खुनानंतर 9 वर्षांचा मुलगा व 7 वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन आशा घराबाहेर पडली. घराला बाहेरून तिने कुलूप लावला होता. शनिवारी सकाळी शेजाऱ्यांनी घरमालकाला कळविले. मध्यरात्री त्या घरातून जोरात आवाज येत होता. खिडकी फुटल्याचाही आवाज झाला. त्यानंतर घरमालक हे दाम्पत्य रहात असलेल्या घरी आले. त्यावेळी बाहेरून कुलूप होता. आशाशी संपर्क साधून त्यांनी तिला बोलावून घेतले. ‘पती आजारी आहेत, ते झोपले आहेत म्हणून आपण घराला कुलूप लावल्याचे’ आशाने सांगितले. कुलूप उघडून घरात डोकावले असता खुनाची घटना उघडकीस आली. त्यानंतर माळमारुती पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पतीचा खून करणाऱ्या आशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वडिलांचा खून झाला, आईला अटक झाली, आता दोन्ही मुले अनाथ झाली आहेत.









