एका विदेशी नागरिकाला अटक
प्रतिनिधी/ पणजी
अमलीपदार्थ विरोधी विभागाने पर्वरी येथे केलेल्या कारवाईत 2 लाख रुपये किंमतीचा अमलीपदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात एका विदेशी नागरिकाला अटक केली आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला असून, त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव पॅट्रीक बहा (वय 24) असे आहे. संशयित ड्रग्जची विक्री करण्यासाठी पर्वरीत येणार असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. संशयित ठरलेल्या वेळेनुसार जाग्यावर येताच त्याला सापळा रचून रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून 12 ग्रॅम कोकेन व 8 ग्रॅम एम्फाटामाईन जप्त केला तसेच त्याने ज्या दुचाकीमध्ये ड्रग्ज ठेवला होता ती दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.
अमलीपदार्थ विरोधी विभागाचे उपनिरीक्षक दीनदयालनाथ रेडकर, कॉन्स्टेबल लक्ष्मण म्हामल, मकरंद घाडी, योगेश मडगावकर, अमित साळूंके यांनी निरीक्षक सजीत पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. एएनसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









