शहापूर येथील युवकाला अटक : बेळगावात प्रथमच कारवाई, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलिसांचे कौतुक
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात अमलीपदार्थांची विक्री व वापर वाढला आहे. टिळकवाडी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अनगोळ येथे साडेतीन लाखांचे एमडीएमए हे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. यासंबंधी शहापूर येथील युवकाला अटक केली आहे. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या मार्गदर्शनाखाली खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक कपिलदेव ए. जी., हवालदार महेश पाटील, ए. व्ही. निलप्पन्नवर, नवीनकुमार जी., मल्लिकार्जुन पात्रोट, सी. डी. तेली आदींचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. रिजवानखान फईमखान पठाण (वय 34) रा. अळवण गल्ली, शहापूर असे त्याचे नाव आहे. अनगोळ नाथ पै तलावाजवळील भांदूर गल्लीनजीक शनिवारी सायंकाळी पोलिसांनी रिजवानखानला अटक केली असून त्याच्याजवळून 3 लाख 64 हजार 500 रुपये किमतीचे 39 ग्रॅम 450 मिली मेथापेंटामाईन (एमडीएमए) जप्त केले आहे. पोलिसांनी जप्त केलेला अमलीपदार्थ खड्यांच्या स्वरुपात आहे. बेळगावात प्रथमच ते जप्त करण्यात आले आहे. यापूर्वी गांजा, हशिश, चरस, पन्नी, हेरॉईन आदी जप्त करण्यात आले आहेत. मेथापेंटामाईन प्रथमच जप्त केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. नशेबाजांना विकण्यासाठी हे अमलीपदार्थ रिजवानखानने आणले होते. पोलिसांनी अटक केलेल्या रिजवानखानवर 21(बी) अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रिजवानखानने हा साठा कुठून आणला? याची चौकशी करण्यात येत आहे. या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकारी व पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.









