पुणे / वार्ताहर :
पुणे लोहमार्ग पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेला, तसेच न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणातील तब्बल एक हजार किलो गांजा आणि सात किलो 896 ग्रॅम चरस पोलिसांनी नष्ट केला. लोहमार्ग पोलिसांनी नष्ट केलेल्या अमली पदार्थांची एकूण किंमत सहा कोटी 25 लाख रुपये एवढी आहे.
लोहमार्ग पोलिसांकडून गांजा, चरससह अन्य अमली पदार्थांची वाहतूक तसेच विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. पुणे, दौड, कुर्डुवाडी आणि सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पथकांकडून 1992 पासून आतापर्यंत अंमली पदार्थांच्या कारवाईमध्ये एकूण 47 गुह्यांमध्ये एक हजार 500 किलो गांजा आणि चरस असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यापैकी 29 गुन्हय़ातील गांजा आणि चरस असे अमली पदार्थ लोहमार्ग न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपअधीक्षक चंद्रकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या समितीने खडकी मुख्यालय येथे अंमली पदार्थांचा पंचनामा केला व ते भट्टीत जाळण्यात आले.








