अन्य एका कारवाईत सोनेही जप्त
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी थायलंडमधील दोन महिलांना ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक केली आहे. दोन्ही महिला थायलंडमधील फुकेट येथून दिल्लीला पोहोचल्या होत्या. झडतीदरम्यान त्यांच्या 4 ट्रॉली बॅगमध्ये 27.08 किलो वजनाचे हिरव्या रंगाचे 54 पॅकेट अमली पदार्थ आढळून आले. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे 27 कोटी रुपये असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
विमानतळावरील अन्य एका कारवाईत सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 172 ग्रॅम सोने आणि एक सोनसाखळी जप्त केली आहे. 56 वर्षीय भारतीय प्रवासी जेद्दाहून दिल्लीला येत होता. प्रवाशाच्या सामानाचे एक्स-रे स्कॅनिंग करताना अलार्म वाजल्यानंतर तपासणी करण्यात आली. यावेळी खजूरांच्या पाकिटात लपवलेले 172 ग्रॅम सोन्याचे कापलेले तुकडे आणि एक सोनसाखळी आढळली. कस्टम अधिक्रायांनी सोने जप्त केले असून ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.









