बेकायदा राहणाऱ्या तीन स्विडीश नागरिकांना अटक : एएनसी अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली माहिती
पणजी : अमली पदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) हरमल येथे केलेल्या कारवाईत 2 कोटी 59 लाख 65 हजार ऊपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणात तीन स्विडीश नागरिकांना अटक केली आहे. संशयितांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम 22(सी), 22(बी), 22(ए) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तिन्ही संशयित बेकायदेशीररित्या गेल्या अडीज वर्षापासून गोव्यात राहत होते. अशी माहिती एएनसी अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली आहे.
काल पणजीतील पोलिस मुख्यालयाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनिता सावंत बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत एएनसी उपअधीक्षक नॅर्लोन आल्बुकर्क, निरीक्षक सजीत पिल्लई व अन्य उपस्थित होते. अटक केलेल्या संशयितांमध्ये आंद्रियास लोरेन्झो कॅलिक (39 वर्षे, स्वीडीश, पासपोर्ट क्रमांक:-35584065, 24 मार्च 2021 रोजी जारी केला असून 24 मार्च 2026 पर्यंत वैध आहे.), सामी अँटेरो हिल्डेन टांस्कानेन (36 वर्षे, स्वीडन राष्ट्रीय, पासपोर्ट क्रमांक:-97509178, 14 जानेवारी 2020 रोजी जारी केला असून 14 जानेवारी 2025 पर्यंत वैध होता. पासपोर्टची मुदत संपूनही संशयित गोव्यात राहत होता), जोएल इमॅन्युएल कार्लस्ट्रॉम (33 स्वीडन राष्ट्रीय, पासपोर्ट क्रमांक:-एए5242010, 16 एप्रिल 2024 रोजी जारी केला असून 16 एप्रिल 2029 पर्यंत वैध आहे.) यांचा समावेश आहे.
तिघेही संशयित मधलावाडा-हरमल येथील कृष्णा श्रीधर गडेकर यांच्या मालकीच्या घरातील दुसऱ्या मजल्यावर राहत होते. संशयित ड्रग्ज प्रकरणात असल्याचा संशय एएनसी पोलिसांना होता. पोलिस त्यांच्यावर नजर ठेऊन होते. सोमवारी रात्री उशिरा संशयित राहत असलेल्या खोलीवर पोलिसांनी छापा मारला आणि संशयितांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या ताब्यातून 24.8 ग्रॅम एलएसडी द्रव, 0.6 ग्रॅम वजनाचे 70 एलएसडी पेपर, 49.3 ग्रॅम केटामाईन द्रव, 1.5 ग्रॅम केटामाईन पावडर, मिळून एकूण 2 कोटी 59 लाख 65 हजार ऊपये किमतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. ही कारवाई निरीक्षक सजित पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर, सहाय्यक उपनिरीक्षक एस. कोनाडकर, हवालदार हसन शेख, सोयरू हडफडकर, इ. फार्नांडिस, कॉन्स्टेबल गोदीश गोलतेकर, मकरंद घाडी आणि चालक विठ्ठल फडते यांनी केली आहे.
कॉम्बिंग ऑपरेशन दिखावू कार्यक्रम काय?
गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर गोवा पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करून भाडेकरूंची पडताळणी केली आहे. तसेच बेकायदेशीरपणे गोव्यात रहाणाऱ्या विदेशी नागरिकांची तपासणी केली आणि काही जणांवर कारवाई केली आहे. मात्र गेल्या अडीज वर्षापासून गोव्यातील हरमल येथे बेकायदेशीरपणे राहत असलेले हे स्वीडीश संशयित उत्तर गोवा पोलिसांना कसे आढळले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पडताळणी मोहीम हा पोलिसांचा कार्यक्रम केवळ नावापुरताच आणि दिखावा होता का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या घरात संशयित भाड्याने राहत होते त्या घरमालकाने त्यांची माहिती पोलिसांना दिली होती का? याचाही तपास होणे गरजेचे आहे. जर दिली नसेल तर त्या घरमालकावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.









