पाच तस्करांना अटक : दिल्ली पोलिसांची यशस्वी कारवाई
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांनी बुधवारी एका ड्रग्ज तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करून एक मोठे यश मिळवले. उत्तरेकडील भागात ड्रग्ज तस्करीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त करत 5 ड्रग्ज तस्करांना अटक केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या ड्रग्जची किंमत साधारणपणे 12 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांच्या या यशस्वी कारवाईने ड्रग्ज व्यापार आणि मोठ्या तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे.
दिल्लीमध्ये 12 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्यानंतर अटक केलेल्या तस्करांची चौकशी सुरू आहे. या तस्करीचे दिल्ली आणि इतर राज्यांशी संबंध असू शकतात, असे मानले जात आहे. याप्रकरणी पोलीस तस्करी नेटवर्क उघड करण्यासाठी सखोल चौकशी आणि तपास करत आहेत.
दिल्ली पोलिसांना गेल्या काही काळापासून दिल्ली आणि उत्तर भागातून तस्करीची माहिती मिळत होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई सुरू केली. अनेक दिवसांच्या कठोर परिश्रमानंतर, पोलिसांनी पाच तस्करांना अटक करत सुमारे 12 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. दिल्लीला ड्रग्जमुक्त करण्यासाठी दिल्ली पोलीस सतत कारवाई करत तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश करत आहेत. दिल्लीतील या यशस्वी कारवाईनंतर पोलीस अनेक प्रमुख नाक्यांवरही तपास करत इतर तस्करांचाही शोध घेत आहेत.









