प्रतिनिधी /पेडणे
पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी पेडणे पोलीस स्थानकाचा ताबा घेतल्यानंतर लगेच हरमल येथे धाड टाकून एका विदेशी महिलेकडून एक लाख 22 हजार रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला.
एका खात्रीलायक माहितीनुसार हरमल येथील एका गेस्टहाऊस मध्ये एक महिला अमलीपदार्थ व्यवहार करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एक टीम तयार करून घटनास्थळी पाठवण्यात आली. त्यात उपनिरीक्षक विवेक हळणकर पोलीस महिला उपनिरीक्षक सुमेधा नाईक, धनश्री, पोलीस कॉन्स्टेबल प्रेमनाथ सावळ देसाई, सतीश गावस आदींनी ही कारवाई केल्याची माहिती राऊत यांनी दिली.
हरमल गिरकरवाडा येथील एका गेस्टहाऊसमध्ये नेदरलँड येथील विदेशी महिला जॉडी कॉपर्स (वय 39) हिला पेडणे पोलिसांनी अमलीप्रदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद करुन ताब्यात घेऊन अटक केली. सुरुवातीला तिची झडती घेतली असता तिच्याकडे विविध प्रकारचे अमलीपदार्थ सापडले. त्याची बाजारात किमत 1 लाख 22 हजार पर्यंत आहे.
पेडणे तालुका पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर पुढील तपास करीत आहेत.









