दोन संशयितांना अटक : सीआयडीची धडक कारवाई
प्रतिनिधी /पणजी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (सीआयडी) म्हापसा व हणजूण येथे केलेल्या कारवाईत 17 लाख 60 हजार रुपये किमंतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली आहे. संशयितांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नेंद केला असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये डॅल्टन एडवर्ड डायगो द कॉस्ता (26, म्हापसा) व गिवोवान्नी रॉबर्ट कासो उर्फ बॉबी (83, अमेरिकी नागरिक) यांचा समावेश आहे.
संशयितांवर पाळत ठेवून कारवाई
हणजूण मायकलवाडा येथे ड्रग्सचा व्यवहार होत असल्याची माहिती सीआयडी पोलिसांना मिळाली होती. गेल्या काही दिवसांपासून सीआयडी पोलीस संशयितांवर नजर ठेवून होते. गुरुवारी रात्री संशयितांच्या खोलीवर छापा मारून त्याला रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याकडून एमडीएमए व एलएसडी द्रव मिळून सुमारे 15 लाख रुपये किमंतीचा ड्रग्ज जप्त केला आहे. संशयित गिवोवान्नी हा 1968 पासून गोव्यात येत होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
करासवाडा येथे दुसरी कारवाई
दुसऱया कारवाईत करासवाडा-म्हापसा येथील फ्लायओवरच्या खाली संशयास्पदरित्या उभा असलेल्या डॅल्टन याला सीआयडीने ताब्यात घेतले. त्याचा तपास केला असता त्याच्याकडे गांजा व हशिष तेल मिळून सुमारे 2 लाख 60 हजार रुपये किमंतीचा ड्रग्ज सापडला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
साडेतीन महिन्यांत सुमारे दोन कोटींचे ड्रग्ज जप्त
अमलीपदार्थ विरोधी विभागाच्या पोलिसांसह गुन्हा अन्वेषण विभागाने व अन्य पोलिसांनी ड्रग्ज विरोधात धडक मोहिमा राबविणे सुरु ठेवले आहे. विविध पथके तयार करून संशयित ठिकाणी धाडी घालणे सुरुच आहे. गेल्या साडेतीन महिन्यात 1 कोटी 83 लाख 63 हजार 400 रुपये किमंतीचा ड्रग्ज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. विविध ठिकाणच्या 35 तक्रारी नोंद केल्या असून 42 संशयितांना अटक केली आहे. अटक पेलेल्या संशयितांमध्ये 11 गोमंतकीय, 21 परप्रांतीय तर 10 विदेशी संशयितांचा समावेश आहे.









