महिलेसह नऊ जणांच्या आवळल्या मुसक्या, मुंबई एनसीबीची सापळा रचून कारवाई
प्रतिनिधी/ पणजी
मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) एका महिन्याहून अधिक काळ ऑपरेशन राबवित गोव्यात होऊ घातलेली अमलीपदार्थांची तस्करी रोखण्यात यश मिळविले. एनसीबीने गोवा, महाराष्ट्रातील विविध भागात तसेच महत्त्वाच्या शहरांमध्ये छापे टाकत 135 कोटी रुपयांचे ड्रग्ज, तसेच एका महिलेसह नऊ अमलीपदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करताना मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने एकूण 135 कोटी ऊपयांचे सुमारे 206 किलो कोकेन आणि अप्राझोलम जप्त केले. गुजरात, महाराष्ट्र ते गोव्यापर्यंत एनसीबीच्या पथकाने गुप्तचर माहितीचा वापर करून हे ऑपरेशन यशस्वी केले.
135 कोटीचे कोकेन, अल्प्राझोलम जप्त
या कारवाईत एव्हलिना अल्वारिस या महिलेबरोबरच इतर नऊजणांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये एनसीबीच्या पथकाने 6.959 किलो कोकेन आणि 199.25 किलो अप्राझोलम जप्त केले आहे. याची किंमत 135 कोटी इतकी आहे.
मुंबईहून होणार होती तस्करी
पर्यटन मोसमात अमलीपदार्थाची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण होते. मुंबईहून गोव्यात अमलीपदार्थ जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. गोव्यात येणारे पर्यटकांचे वाढते लोंढे पाहून संशयित आरोपींनी गोव्याला तस्करीच्या बाजारपैठांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण मानून अमलीपदार्थांच्या तस्करीसाठी लक्ष्य बनविले होते.
गोवा पोलीस लक्ष ठेवून होते
गोव्यात मुंबईमार्गे मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ पुरविला जाणार असल्याची माहिती राज्यातील अमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. तस्करी करणारे मुंबईतून सुटल्यानंतर गोवा पोलीस त्यांना पकडण्यासाठी लक्ष ठेवून होते, अशी माहिती अमलीपदार्थ विरोधी विभागाचे अधीक्षक बोसुएट सिल्वा यांनी एनसीबीच्या कारवाईनंतर दिली.









