कोची सागरी हद्दीत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
वृत्तसंस्था/ .कोची
अरबी समुद्रात कोचीच्या सागरी हद्दीत अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एनसीबी आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे या कारवाईत सुमारे 2,500 किलो वजनाचे मेथॅम्फेटामाईन जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे 12 हजार कोटी रुपये आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. या कारवाईत एका संशयित पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेल्या पाकिटांवर हाजी दाऊद अँड सन्स असे लिहिलेले आढळून आले.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) भारतीय नौदलासोबत केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मोहिमांपैकी ही एक मोहीम आहे. कोचीच्या समुद्रहद्दीत जप्त करण्यात आलेली मेथॅम्फेटामाईनची ही सर्वात मोठी जप्ती आहे. यापूर्वी 2021 मध्ये मुंद्रा बंदरात 2,988 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 42 व्यक्ती आणि सात कंपन्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या गुजरातस्थित गांधीधाम युनिटने 13 सप्टेंबर 2021 रोजी यासंबंधी गुन्हा दाखल केला होता. अफगाणिस्तानातून इराणच्या बंदर अब्बास या शहरातून ही खेप भारतात तस्करी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पंजाबमधील अमृतसरचा रहिवासी पंकज वैद्य उर्फ अमित याच्याविरुद्ध अहमदाबादमधील विशेष एनआयए न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.









