यातूनच जिल्हा नशेच्या पदार्थांची सप्लाय चेन बनला आहे
कोल्हापूर : गांजासह, एमडी, ड्रग्ज यासह अंमली पदार्थाच्या तस्करीवर कोल्हापूर पोलिसांनी धडक कारवाई करुन पायबंद घातला आहे. मात्र नशेखोर नशेसाठी विविध इंजेक्शनचा वापर करत आहेत. यासोबत काही तरुण शरीर पिळदार करण्यासाठीही अशाच इंजेक्शनचा वापर करुन आरोग्य धोक्यात घालत आहेत.
बंदी असणारी अशी घातक इंजेक्शन ऑनलाईनसह मेडीकलमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देण्यात येत असून यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. गोवा बनावटीच्या दारुचा महापूर, अंमली पदार्थांची तस्करी, गुटख्याची छुप्या मार्गाने होणारी वाहतूक यापूर्वी जिह्यात होत होती. मात्र आता जिह्यात गांजासोबतच एम.डी. ड्रग्ज, चरस, कोकेन, अफुला मागणी वाढली आहे.
यातूनच जिल्हा नशेच्या पदार्थांची सप्लाय चेन बनला आहे. पोलिसांनी या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे, मात्र अंमली पदार्थांचे तस्कर रोज नवनवीन मार्गाने याचा पुरवठा करत आहेत. गोवा, राजस्थान, ओरिसा, प. बंगालपासून हिमाचल प्रदेश येथील अंमली पदार्थांना कोल्हापूरात मागणी आहे. या विरोधात कोल्हापूर पोलिसांनी गेल्या 2 वर्षात धडक कारवाई करत गांजा, अंमली पदार्थाची पाळेमुळे खणून काढली आहेत.
गांजा आणि इतर अंमली पदार्थ उपलध्य होत नसल्यामुळे नशेखोर नशेसाठी काही घातक इंजेक्शनचा वापर करत आहेत. या इंजेक्शनचे दुरगामी परिणाम शरिरावर होत आहेत. तात्पुरती नशा आणि शरीर पिळदार करण्याच्या नादात तरुण इंजेक्शनचा वापर करुन संपूर्ण आयुष्य अंधाराच्या खाईत ढकलत आहेत.
शरीरास घातक
कमीत कमी वेळेत अधिक पिळदार शरीर करण्यासाठी जिम करणारे तरुण सध्या सप्लीमेंटच्या नावावर काही घातक इंजेक्शनचा वापर करत आहेत. हे इंजेक्शन घेतल्यानंतर स्टॅमिना वाढतो, थकवा जाणवत नाही, उत्तेजक द्रव्य म्हणून याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे इंजेक्शन वारंवार सेवन केल्याने शरीराचा एखादा भाग निकामी होऊ शकतो. याचे दुरगामी परिणाम शरीरावर होतात.
शरीरावर साईड इफेक्टचा धोका
“ट्रामॅडॉल आणि इपेड्रीन सारख्या औषधांचा वापर करत आहेत. अगदी वीस रुपयात दहा गोळ्या मिळतात. याचे शरीरावर साईड इफेक्ट होतातच. आता या औषधामुळे स्मृतीभ्रंश, पोटविकार, आदी गंभीर आजारांचा सामना नशेबाजांना करावा लागत आहे. डोळे आत जातात, छाती आत जाते, ओठ काळे पडतात. स्मृतीभ्रंश, पोटाचे गंभीर आजार उद्भवत असल्याने नशा करणे टाळावे.”
- डॉ. सचिन पाटील, हृदयरोग तज्ञ








