बिडेन यांच्या पुत्रावर संशय : अमली पदार्थांच्या सेवनाची दिली होती कबुली
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाइट हाउसमध्ये अमली पदार्थ आढळून आले आहेत. याप्रकरणी सीक्रेट सर्व्हिसची टीम तपास करत आहे. व्हाइट हाउसच्या वाचनालयानजीक हे अमली पदार्थ आढळून आले होते. यानंतर तेथील हिस्सा काही काळासाठी रिकामी करविण्यात आला होता. हे अमली पदार्थ कोकेन असल्याची पुष्टी आता झाली आहे.
व्हाइट हाउसमध्ये आढळून आलेली व्हाइट पावडर ही कोकेन हायड्रोक्लोराइड असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती तपास पथकाकडून देण्यात आली आहे. सध्या याप्रकरणी तपास सुरू असल्याने कुठल्याही प्रकारची टिप्पणी करणे योग्य ठरणार नसल्याचे सीक्रेट सर्व्हिसकडून म्हटले गेले आहे.
या घटनेवेळी अध्यक्ष जो बिडेन हे व्हाइट हाउसमध्ये नव्हते असे समजते. कुटुंबीयांसोबत ते कॅम्प डेव्हिड येथे असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थ व्हाइट हाउसमध्ये कशाप्रकारे पोहोचले हा प्रश्न आता तपास यंत्रणांसमोर उभा ठाकला आहे. सीक्रेट सर्व्हिसची एक टीम दररोज व्हाइट हाउसची तपासणी करत असते, या टीमलाच हे अमली पदार्थ आढळून आले आहेत.
अध्यक्ष बिडेन यांचे पुत्र हंटर (53 वर्षे) यांच्यावर अमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप होत राहिला आहे. हंटर हे कोकेनचे सेवन करत असल्याचे बोलले जाते. वडिलांसोबत कॅम्प डेव्हिड येथे जाण्यापूर्वी हंटर हे व्हाइट हाउसमध्येच होते. बिडेन कुटुंब मंगळवारी व्हाइट हाउसमध्ये परतले आहे.
2015 मध्ये छोटा भाऊ बीयूच्या मृत्यूनंतर कोकेनचे सेवन करण्याचे व्यसन लागले होते. या व्यसनापासून मुक्तता मिळविण्यासाठी एक वर्षापर्यंत उपचार करवून घ्यावे लागले होते असे हंटरने स्वत:च्या आत्मचरित्र ‘ब्युटीफूल थिंग्स’मध्ये म्हटले आहे. हंटर यांच्या एका लॅपटॉपची तपासणी गुप्तचर यंत्रणांनी केली आहे. मागील महिन्यात हंटर यांनी अमली पदार्थ अन् एक गन खरेदी केल्याप्रकरणी न्याय विभागासमोर हजर रहावे लागले होते. याप्रकरणी ते दोषी ठरल्यास त्यांना दोन वर्षांच्या प्रोबेशन पीरियडला सामोरे जावे लागणार आहे. तसेच हयातभर बंदूक बाळगता येणार नाही.