पोलीस आयुक्तांचे नशामुक्त बेळगावसाठी प्रयत्न : जुन्या नेटवर्कचा पिच्छा पुरवणे गरजेचे, गुन्हेगारी प्रकरणात सहभाग उघड
बेळगाव : नशामुक्त बेळगावसाठी पोलीस दलाने कंबर कसली आहे. नूतन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांबरोबरच सेवन करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची सूचना दिली आहे. बेळगावात अलीकडच्या काही वर्षात सुरू असलेल्या गुन्हेगारी घटना लक्षात घेता बहुतेक घटना गांजाच्या नशेत झाल्याचे दिसून आले आहे. एकेकाळी अमलीपदार्थांच्या तस्करीत आंतरराष्ट्रीय पातळीवर बेळगावचे नाव ठळक चर्चेत होते. आताही जुने नेटवर्क सुरू झाले आहे का? असा संशय बळावत चालला आहे. बेळगावला गांजा पुरवठा करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. स्वत: पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेतल्यामुळे संपूर्ण यंत्रणा अमलीपदार्थांविरुद्ध कामाला लागली आहे. गांजा, पन्नी, हेरॉईन जप्त करण्याचा सपाटा सुरू आहे. बेळगावला इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा कुठून येतो, हाच एक मोठा प्रश्न आहे. पूर्वी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांबरोबरच शेजारच्या सांगली जिल्ह्यातूनही गांजा बेळगावला येत होता. आता मध्यप्रदेशमधून मोठ्या प्रमाणात कर्नाटकातील विविध भागात गांजा पुरवठा केला जात असल्याची माहिती आहे.
एक वर्षापूर्वी बिदर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला होता. मध्यप्रदेशमधून ट्रकभर साठा मुंबईला नेण्यात येत होता. त्यावेळी मध्यप्रदेशच्या जंगलातून महाराष्ट्र, कर्नाटकातील विविध जिल्ह्यात गांजा पुरवठा होतो, अशी माहिती उघडकीस आली होती. आता बेळगावला गांजा पुरवठा करणारे गुन्हेगार रेल्वेचा आधार घेत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी अबकारी व रेल्वे सुरक्षा दलाने दोन वेगवेगळ्या कारवाया करून गांजा जप्त केला होता. 18 जून रोजी लोंढा रेल्वेस्थानकाजवळ अधिकाऱ्यांनी एका बॅगमधून 4 किलो 211 ग्रॅम व आणखी एका बॅगमधून 10 किलो 281 ग्रॅम गांजा जप्त केला होता. गांजा वाहतूक करणारे आरोपी कोण? याचा उलगडा झाला नाही. रेल्वेच्या डब्यातून हा साठा नेण्यात येत होता. या घटनेवरून गांजा वाहतूक करणारे गुन्हेगार पोलिसांना चकविण्यासाठी रेल्वेत प्रवास करीत असल्याचे उघडकीस आले आहे. जर पोलीस, अबकारी किंवा रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी आले तर बॅग तेथेच सोडून सहजपणे तेथून पळून जाता येते, असा यामागचा उद्देश आहे.
शहर सीईएनच्या अधिकाऱ्यांनीही पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हालभावी चिगरी माळ क्रॉसनजीक 5 किलो 652 ग्रॅम गांजा जप्त केला होता. 29 जून रोजी गोकाक तालुक्यातील दोघा जणांना अटक करून हा साठा जप्त करण्यात आला होता. पोलीस दलाबरोबरच अबकारी विभागाकडूनही बेकायदा मद्य वाहतुकीबरोबरच गांजा व इतर अमलीपदार्थांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. कारवाईचा सपाटा सुरू असूनही गांजाची विक्री थोपविणे शक्य होईना, अशी स्थिती आहे. तरुणाईला नशेच्या विळख्यातून वाचविण्यासाठी पोलीस दलाकडून शाळा- कॉलेजमध्ये जागृतीची मोहीमही राबविण्यात येत आहे. सहजपणे व स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या गांजाच्या नशेत तरुण गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत आहेत. एक काळ असा होता, की पंधरा वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात मँड्रेक्स, हशिश आदी अमलीपदार्थ सहजपणे उपलब्ध होत होते. बेळगावातून अनेक देशांना अमलीपदार्थ पुरवठा केला जात होता.
सध्याचे माहिती खात्याचे आयुक्त हेमंत निंबाळकर हे बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हशिशची विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. सध्या बागलकोटमध्ये अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख असणारे महांतेश्वर जिद्दी व त्यांच्या सहकाऱ्यांचीही या कारवाईत मोठी भूमिका होती. नेपाळसह इतर देशातून मँड्रेक्स बेळगावात येत होते. बेळगावातून देशभरातील प्रमुख महानगरात फोटोफ्रेममधून अमलीपदार्थ पाठविण्यात येत होते. चेन्नई विमानतळावर तपासणीच्या वेळी देवदेवतांच्या फोटोफ्रेममागे हशिश चिकटवल्याचे उघडकीस आल्यानंतर बेळगावातील रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. बेळगावातून रोज गोव्याला अमलीपदार्थ पुरवठा केला जात होता.
सध्या गांजा, पन्नी व हेरॉईनची विक्री वाढली आहे. बेळगाव येथील ड्रग्ज नेटवर्क पुन्हा सक्रिय झाल्याचा संशय आहे. अमलीपदार्थांची विक्री व तस्करी करून अनेक जण कोट्याधीश बनले आहेत. त्याचे सेवन करणारे मात्र व्यसनाधीनतेमुळे आपले जीवन उद्ध्वस्त करून घेत आहेत. गुन्हेगारीचे प्रकार वाढीस व तरुणाईला गुन्हेगार बनविण्यात अमलीपदार्थ हेही एक प्रमुख कारण असून ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे मोडले तरच गुन्हेगारी थोपवता येणार आहे. यासाठी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सकारात्मक पावले उचलली आहेत.









