कोल्हापूर :
शहरात ड्रग्ज विक्री करणारे रॅकेट जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी उघडकीस आणले होते. या रॅकेटला ड्रग्ज पुरवठा करणारी प्रमुख महिला गोव्यातील असून, तीचा शोध पोलीस घेत आहेत. लवकरच जुना राजवाडा पोलिसांचे एक पथक गोव्यात तपासासाठी जाणार आहे.
अंमली पदार्थ विक्री करणारी आंतरराज्यीय टोळीचा जुना राजवाडा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या प्रकरणी अनिल संतराम नंदीवाले (वय 31) आणि रोहित बसूराज व्हसमणी (24, दोघे रा. माळवाडी, दोनवडे, ता. करवीर), मनिषा महेंद्र गवई (वय 25 रा. नवीमुंबई), एडमंड दिलीप स्पेन्सर परेरा (वय 54 रा. नवी मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या ड्रग्ज विक्री रॅकेटचा नंदा अनिल नंदीवाले हा कोल्हापुरातील मुख्य खरेदीदार होता. ड्रग्ज विक्रीतून अनिल नंदीवाले, रोहित व्हसमणी यांनी गेल्या सात महिन्यांत सुमारे सात लाखांची कमाई केली आहे. ड्रग्ज विक्रीसाठी तो व्होसमणी याला पाठवत होता. विक्री झालेल्या ड्रग्जनुसार कमिशन पद्धतीने व्होसमणीला पैसे मिळत होते. या दोघांनी शहरासह जिह्यातील काही विक्रेत्यांनाही ड्रग्जचा पुरवठा केला आहे. त्या विक्रेत्यांची नावे पोलिसांना मिळाली आहेत. त्यांच्यावरही लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
5 महिन्यात 7 लाखांची कमाई
नंदीवाले आणि होसमणी यांनी गेल्या 5 महिन्यात 7 लाख रुपयांच्या अंमली पदार्थांची खरेदी केली आहे. नंदीवाले हा 1500 ते 1800 रुपये प्रतिग्रॅम दराने ड्रग्जची खरेदी करीत होता. पुढे तो 2200 ते 2500 रुपये प्रतिग्रॅम दराने विक्री करायचा. यातही कमी वजनाच्या आणि भेसळ केलेल्या पुड्या विकून तो पैसे मिळवत होता. त्याने विक्रीसाठी स्वत: चे रॅकेट तयार केले होते.








