आतापर्यंत 11 जण ताब्यात, डिचोलीत यापुढे अंमलीपदार्थ विरोधी कारवाई सुरूच राहणार
डिचोली : डिचोली पोलिसांनी सध्या तालुक्मयातील ड्रग्ज पेडलर्सविरोधात कठोर कारवाईचे मोहीमच हाती घेतली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये 11 जणांना डिचोली पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अटक केली आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी चौकशी सुरू आहे. डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक सागर एकोसकर व निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या डिचोली पोलीस संबंधित ड्रग्स पेडलर्सच्या शोधात आहेत. गेले तीन दिवस डिचोली पोलीस स्थानकातील एक विशेष पथक ड्रग्ज व्यवहारात गुंतलेल्यांच्या शोधात आहे. तीन दिवसांत एकूण 11 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांना 151 कलमाखाली (प्रतिबंधात्मक उपाय) अटक करून सखोल चौकशी करण्यात आली आहे. या 11 पैकी 7 जण सांखळीतील तर 4 जण डिचोलीतील आहेत. या प्रकरणी सध्या डिचोली पोलीस बरेच आक्रमक झालेले असून ही मोहीम चालूच राहणार असल्याची माहिती मिळाली.
अनेक तक्रारी आल्यानंतर कारवाईची मोहीम
ड्रग्ज व्यवहाराबाबत पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांच्याशी या प्रतिनिधीने संपर्क साधला असता, डिचोली तालुक्मयात अंमलीपदार्थाचे व्यवहार व सेवनही बरेच वाढल्याच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. काही दिवस या विषयावर अभ्यास करून त्यात गुंतलेल्यांची माहिती मिळवली व आता त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ही मोहीम चालूच राहणार असून डिचोली तालुक्मयात म्हणजेच डिचोली पोलीस स्थानकाच्या हद्दीत यापुढे अमली पदार्थ व्यवहाराला थारा देणार नाही. अशाप्रकारे कोणीही व्यवहार किंवा व्यवसाय करीत असल्याचे लक्षात आल्यास किंवा माहिती असल्यास प्रत्यक्ष आपणास माहिती दिल्यास ‘त्या’ व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल, असे सांगितले.
कारवाईबाबत ढिलाई नाहीच!
आगामी काळात ड्रग्ज व्यवहार प्रकरणात गुंतलेल्या किंवा बाहेरून येऊन डिचोलीत अंमलीपदार्थ पुरविणाऱ्यांना ताब्यात घेतले जाणार आहे. याबाबत आता कोणतीही ढिलाई केली जाणार नाही. पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांना सुध्दा स्पष्ट सूचनाच देण्यात आली आहे, असेही निरीक्षक राहुल नाईक यांनी सांगितले.
पीडित पालकांनीही पोलिसांना सहकार्य करावे!
अंमलीपदार्थाच्या आहारी गेलेल्या मुलांच्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवते. याचा अंदाज आपणास आहे. अशा पालकांनीही या प्रकरणी पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे. आपल्या मुलांच्या तसेच पुढील पिढीच्या सुरक्षित भवितव्यासाठी या मोहिमेत पालकांनीही पोलिसांना यासाठी माहिती देण्यास पुढे यावे, असे आवाहनही पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांनी केले आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी जातात आहारी
सध्या या अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांचे प्रस्थ वाढतच आहे. विविध ठिकाणी, नाक्मयांवर, निर्जनस्थळी हे पेडलर्स आपल्या ग्राहकांना बोलावून त्यांच्या हातात हळूच ‘पुडी’ देतात व बारीक घडी केलेली पैशाची नोट घेऊन जातात. काही ठिकाणी तर गजबजलेल्या ठिकाणीही आता सर्रास हे व्यवहार होऊ लागले आहेत. गांजा हा अंमलीपदार्थ जास्त प्रमाणात विक्री केला जातो. व त्यांच्या आहारी गेलेल्यांचीही संख्या बरीच वाढली आहे. रात्री अपरात्री फिरणाऱ्या अल्पवयीन युवकांकडून तसेच उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थीही या अंमलीपदार्थांच्या आहारी गेले आहेत.
ग्रामीण भागालाही ड्रग्जची लागण
या नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला पूर्वपदावर आणणे तसे सोपे नसते. अनेक पालकांसमोर आज एक मोठे संकट उभे ठाकले आहे. पूर्वी राज्यातील केवळ मोठ्या शहरांमध्ये व किनारी भागात या अंमलीपदार्थांचे सर्रास सेवन व व्यवहार होत होते. पण गेल्या काही वर्षांत हे लोण राज्यभर पसरले आहे. ग्रामीण भागांसुद्धा सहजपणे गांजा उपलब्ध होऊ लागला आहे. त्यासाठी विशेष युवकांचे टोळके वावरत असते. त्यांची साखळी असते एकाकडून दुसऱ्याकडे ड्रग्ज पुरवठा केला जातो. ही साखळी तोडण्याचे आव्हान डिचोली पोलिसांसमोर आहे.









