संपूर्ण यंत्रणा लावली कामाला : अमलीपदार्थ विक्रेत्यांचे दणाणले धाबे, आजवरची सर्वात मोठी मोहीम
बेळगाव : एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी समाजहिताचा विचार करून काम करण्याचे ठरविले तर याकामी त्यांना यश मिळतेच. दृढ निश्चयाने अशा कामांची सुरुवात करावी लागते. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी बेळगावला नशामुक्त बनविण्याचा संकल्प करून कामाला सुरुवात केली आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणा यासाठी कामाला लावली आहे. नशेच्या आहारी बरबाद होत असलेल्या तरुणाईला वाचवण्यासाठी त्यांचा हा संकल्प महत्त्वाचा ठरला आहे. केवळ तीन महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेल्या भूषण गुलाबराव बोरसे यांनी आपल्या रुबाबदार कामातून एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. बेळगावला नशामुक्त बनविण्यासाठी त्यांनी पोलीस यंत्रणेला कामाला लावले आहे. केवळ अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांवरच नव्हे तर सेवन करणाऱ्यांविरुद्धही कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. त्यांची नावे व छायाचित्रे प्रसिद्धीस दिली जात आहे. त्यामुळेच नशेबाजांचे धाबे दणाणले आहेत.
दोन दिवसांपूर्वी सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेळगावला गांजा पुरवठा करणारा मास्टरमाईंड इस्माईल ऊर्फ सद्दाम बाबू सय्यद (वय 35) याच्यासह नऊ जणांच्या टोळीला अटक करून 50 किलो 452 ग्रॅम गांजा, दोन कार, एक मोटारसायकल, 13 मोबाईल जप्त केले आहेत. बेळगावातील ही आजवरची मोठी कारवाई आहे. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी 19 जुलै 2025 रोजी मच्छे येथील तिघा जणांना अटक करून 23 किलो 840 ग्रॅम गांजा जप्त केले होते. त्यानंतर केवळ महिनाभरात सीईएनच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. गांजा, पन्नी, हेरॉईन आदी अमलीपदार्थांचा पुरवठा कोठून होतो? त्यांचा नेटवर्क कसा चालतो? याची संपूर्ण कुंडली पोलिसांनी जमवली आहे.
सध्या पोलीस अधिकारी गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात आहेत. गणेशोत्सवानंतर मध्यप्रदेश व ओडिशातून गांजा पुरवठा करणाऱ्या नशेच्या सौदागरांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. मध्यप्रदेश आणि ओडिशाचे लिंक उघडकीस येणे हा काही पहिला प्रकार नाही. यापूर्वीही अनेक वेळा या दोन्ही राज्यांचा नेटवर्क कसा चालतो? याची माहिती कर्नाटकातील वेगवेगळ्या जिल्ह्यात झालेल्या कारवाईत उघडकीस आली होती. दीड वर्षांपूर्वी बिदर जिल्ह्यातील वनमारपळ्ळीजवळ बेंगळूर येथील एनसीबी व बिदर पोलिसांनी एक ट्रक अडवून पंधराशे किलो गांजा जप्त केला होता. या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली होती. ओडिशातील मलकानगिरी जंगल परिसरातून हा साठा कर्नाटकात आणल्याचे उघडकीस आले होते. खास करून हा साठा पुणे, मुंबईला पाठविण्यात येत होता. बिदरचे तत्कालिन जिल्हा पोलीसप्रमुख चन्नबसवण्णा एस. एल. यांच्या नेतृत्वाखाली हा साठा ताब्यात घेण्यात आला होता.
आंध्रप्रदेशमधूनही गांजा कर्नाटक व महाराष्ट्रात पाठविला जातो. ट्रकमध्ये दीड टन गांजा पाठविण्यासाठी चोर कप्पे तयार करण्यात आले होते. सिमेंटच्या विटांची वाहतूक करण्यात येत असल्याचे भासवून गांजा वाहतूक केली जात होती. कर्नाटकातील ही सर्वात मोठी कारवाई होती. आता बेळगाव पोलिसांनी बेळगावला गांजा पुरवठा करणाऱ्या संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. आंध्रप्रदेशमधील नक्षलग्रस्त जिल्ह्यातूनही गांजा पुरविला जातो. मध्यप्रदेशमध्ये तर अमलीपदार्थांच्या व्यवसायात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा नेटवर्क कार्यरत असल्याचे भोपाळमध्ये अलीकडे झालेल्या एका कारवाईमुळे उघडकीस आले आहे. 16 ऑगस्ट रोजी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अमलीपदार्थ तयार करणाऱ्या भोपाळमधील एका कारखान्यावर छापा टाकला आहे. मियांव-मियांव या नावाने ओळखले जाणारे 92 कोटी रुपयांचे 61 किलो 20 ग्रॅम मेफेड्रोन व 541 किलो इतर रसायन जप्त केले आहेत. हा कारखाना दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कमधून चालत होता.
बेळगाव पोलिसांनीही गेल्या महिन्याभरात अटक केलेल्या नऊ जणांच्या चौकशीतून पुणे, मुंबई, मध्यप्रदेश, ओडिशापर्यंतच्या नेटवर्कपर्यंतचे धागेदोरे शोधले आहेत. केवळ सीईएनच नव्हे तर शहरातील बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांना अमलीपदार्थांच्या विरोधातील कारवाईसाठी पोलिसांनी जुंपले आहे. कोणत्याही परिस्थितीत बेळगावला नशामुक्त बनविण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पोलीस आयुक्तांनी संपूर्ण यंत्रणा राबविली आहे. शहरात अधिकारी तेच आहेत. केवळ आयुक्त बदलले आहेत. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ जप्त केला जात आहे. ही कारवाई यापूर्वी का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पूर्वी केवळ नावापुरता कारवाई केली जायची. आता यामागे बेळगावला नशामुक्त बनवण्याचा संकल्प आहे. म्हणून नशेचे सौदागर व नशेबाजांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. आपल्याच तरुणाईला नशेच्या विळख्यातून वाचविण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी हा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमाला बेळगावकरांनीही साथ देण्याची गरज आहे.
नशामुक्त बेळगावच्या अभियानामुळेच यंदा कारवाई वाढली
गेल्या तीन वर्षांतील कारवाई लक्षात घेता चालू वर्षी अमलीपदार्थांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याचे दिसून येते. 2023 मध्ये 23 गुन्हे दाखल करून 34 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून 12 किलो 679 ग्रॅम अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याची किंमत 5 लाख 71 हजार 243 इतकी होते. 2024 मध्ये 55 गुन्हे दाखल करून 39 जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याजवळून 11 किलो 788 ग्रॅम अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याची किंमत 10 लाख 68 हजार 950 इतकी होते. अमलीपदार्थांचे सेवन करणाऱ्या 30 जणांवरही कारवाई करण्यात आली आहे. 22 ऑगस्ट 2025 पर्यंत चालू वर्षी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत 129 गुन्हे दाखल करून 44 प्रकरणात गांजा, हेरॉईन व इतर अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 97 जणांना अटक करण्यात आली आहे. 102 किलो 897 ग्रॅम अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याची किंमत 33 लाख 97 हजार 810 इतकी होते. गांजा सेवन करणाऱ्या 85 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नशामुक्त बेळगावच्या अभियानामुळेच चालू वर्षी कारवाई वाढली आहे.









