देवरूख / प्रतिनिधी :
काजळी नदीवर आंघोळीला गेलेल्या युवकाचा काजळी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना संगमेश्वर तालुक्यातील तिवरे ढवळवाडी येथे घडली. श्रेयस रवींद्र ढवळ असे नदीपात्रात बुडालेल्या युवकाचे नाव आहे.
श्रेयस हा काजळी नदीवर आंघोळीला गेला असता बुरंबी कोंडीतील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. हा प्रकार ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर साखरपा पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.
श्रेयस हा उन्हाळी सुट्टी असल्याने गावी आला होता. श्रेयस रत्नागिरीमध्ये शिक्षण घेत होता. यंदा अकरावी परीक्षा उत्तीर्ण होऊन बारावीला गेला होता. अत्यंत मनमिळावू व हुशार विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याला एक बहीण आहे.









