जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेझ यांची अधिकाऱ्यांना सूचना : जिल्हाधिकारी कार्यालयात विकास आढावा बैठक, वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करा यासाठी
बेळगाव : जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. शहर आणि ग्रामीण भागामध्ये पिण्याचे पाणी, रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वांना रोजगार, जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यावर अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याचे मुख्य सचिव तसेच बेळगाव जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेझ यांनी केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित केलेल्या विकास आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्ह्यामध्ये कोणत्याही शहरात अथवा ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. अशावेळी अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेऊन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. समस्या निर्माण झाल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यासाठी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करून देण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी. यासाठी योग्य उपाययोजना राबविण्यात याव्यात. ग्रामीण भागातील जनतेला प्रत्येकाला रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध करून द्यावा. रोजगार कामगारांना वेळेत वेतन देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. पावसाअभावी बेळगाव शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी पाणीपुरवठा विभागाने तयारी करावी. शहरामध्ये सुरू असलेल्या 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. शहरातील कूपनलिकांच्या पाण्याचा दर्जा तपासण्यात यावा. कूपनलिकांना नोंदणी क्रमांक देण्यात यावा. नादुरुस्त असलेल्या कूपनलिकांची दुरुस्ती करून घेण्यात यावी. दुष्काळ परिस्थितीत नवीन कूपनलिका खोदण्याऐवजी असलेल्या कूपनलिकांची दुरुस्ती करून पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे योजनेचा लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यामध्ये 7 हजार लाभार्थी यापासून वंचित असून अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेऊन लाभ मिळवून द्यावा. गृहलक्ष्मी योजना, गृहज्योती आणि शक्ती योजनेतून लाभार्थ्यांना लाभ करून देण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
अंगणवाडी इमारतीसाठी जागा मंजूर करा
समाजकल्याण, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक खात्याकडून विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. आवश्यक ठिकाणी जमीन घेऊन वसतिगृहे उभारण्यात यावीत. यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारती उपलब्ध करून देण्यासाठी जागा मंजूर करून देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असून ही कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहरातील पाणीपुरवठ्यावर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी प्रोबेशनरी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार व्हनकेरी, जि. पं. उपकार्यदर्शी बसवराज हेग्गनाईक, प्रांताधिकारी, तहसीलदार व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
एससीपी-पीएसपी अनुदान खर्च करण्यामध्ये दुर्लक्ष…
एससीपी व पीएसपी अनुदान खर्च करण्यामध्ये दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे नियोजित उद्दिष्ट साध्य करणे अशक्य होत आहे. अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यामध्ये बैलहोंगल, बेळगाव आणि खानापूर तालुक्यांमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली असून नियंत्रणासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, असे सांगितले. दुष्काळ निवारणासाठी सरकारकडून 22.50 कोटी निधी देण्यात आला आहे. या निधीतून नवीन कूपनलिका खोदण्यासाठी निर्बंध आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये 17 हजार जनावरांच्या खाद्याचे किट देण्यात आली आहेत. सध्या 4 हजार किट उपलब्ध झाली असून जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांना या किटचे वितरण करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.









